आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४ वर्षापासून 'जलयुक्त,' तरीही टँकरसंख्येत वाढ; जळगावमध्ये १०२, तर नाशकात ६७ टँकर कार्यान्वित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- राज्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान गत चार वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासन आणि लोकसहभागातून पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. तरीही पाणीटंचाई दूर होत नसून उलट गतवर्षापेक्षा टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिक विभागात एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये १०२   टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात ६७ तर जलसंधारणमंत्री असलेले राम शिंदे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला टंचाईमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. यासाठी राज्यातून प्रथम दुष्काळी गावांची निवड करण्यात आली. त्यासाठी वनविभाग, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, लघुपाटबंधारे या विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवारच्या कामांचे वाटप करण्यात अाले. यासाठी सुरुवातीला लोकसहभागातून हे अभियान राबविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, कंपनी, नागरिकांनी सहभाग नोंदविला. मात्र, कृषी विभाग, वनविभागातील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून स्वत:चे हात ओले करून घेतले. शासनाचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही चार वर्षांत नाशिक विभागातील टंचाई दूर झाली नाही. 


गतवर्षी समाधानकारक पाऊस होऊनही २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील ९६ गावे १३५ वाड्या, धुळे १८ गावे, नंदुरबार २ गावे, जळगाव १२६ गावे तर अहमदनगर जिल्ह्यात ४३ गावांसह १६४ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील यशस्वी आकडेवारी ही केवळ कागदावरच दिसत आहे. आत्तापर्यंत झालेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांमध्ये पाणीसाठा झाला असता तर टंचाईवर त्याचा लाभ झालेला दिसून आला असता. परंतु, केवळ कागदावरच कामे झाली का असाही संशय व्यक्त होत आहे. जी कामे झाली ती प्रामाणिकपणे झाली का असाही प्रश्न जनतेला पडत आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ६३ टँकर चालूू हाेते ते वाढून ६७ वर गेले अाहे. याचबराेबर जळगावमध्ये मागील वर्षी १४ टँकरवरून ते १०२ पर्यंत गेले अाहे. याचबराेबर नगरमध्ये ५२ पाणी टँकर सुरू असल्याचे दिसते. जलयुक्त शिवार याेजना कागदावर दिसत अाहे. 


जलसंधारणमंत्र्यांच्या जिल्ह्यात ५२ टँकर 
जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होण्यासाठी आणि त्याचा लाभ प्रत्येक घटकाला होण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असलेले प्रा. राम शिंदे यांच्यासाठी विशेष जलसंधारण खाते दिले. त्यामुळे शिंदे यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी स्वतंत्र कारभार हाकण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला. यासाठी कृषी विभागातील अधिकारी अन‌् कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. मात्र, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...