आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरीत २४ तासांत ७१ मिमी पाऊस; धरणसाठ्यांमध्ये काही प्रमाणात वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- इगतपुरी शहर, कसारा घाट व पश्चिम घाट माथा परिसरासह तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासांत ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात दमदार हजेरी लावून पावसाच्या सरासरीचा टप्पा पार करणार असल्याचे चित्र आहे. या दोन दिवसांच्या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. 


तालुक्यातील घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा भागात जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील शेती जलमय झाली अाहे. भातशेतीला हा पाऊस पूरक असल्याचे चित्र आहे. यामुळे काही दिवसातच शेतीच्या कामांना वेग येण्याची स्थिती अाहे. परिसरात दडी मारून बसलेल्या व दोन दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसामुळे इगतपुरी व घाेटी शहरातील भाजीविक्रेते व लहान-लहान व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. गत महिन्यात इगतपुरी शहरातील भाजीबाजार परिसरात नगरपरिषदेने काही भागातील अतिक्रमण काढल्याने बरेच लहान व्यापारी, भाजी, फळविक्रेत्यांना भरपावसात व्यापार करताना ओले व्हावे लागत आहे. 


गत दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळांवर मनमाेहक वातावरण असल्याने नाशिकसह मुंबई, कल्याण, कसारा येथून अालेल्या पर्यटकांची तुरळक गर्दी दिसत अाहे. नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे-मार्गावरील माेठ्या पुलांजवळ अनेक तरुण छायाचित्रासाठी गर्दी करत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...