आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणीला केले ‘देवी’; नाशकातील घटना, मांत्रिकांसह चार संशयित अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विधवा महिलेला पैशांची भासणारी चणचण आणि घरासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी एकाने तिला चक्क पैशांचा पाऊस पाडण्याचे अामिष देत ३० हजारांना गंडा घातला. महिलेच्या भोळेपणाचा फायदा घेत तिच्या तरुण पुतणीला  देवी म्हणून  पूजेसाठी बसवत काळी जादू करण्याचा मांत्रिकाचा डाव आडगाव पोलिसांच्या सतर्कतेने हाणून पाडला.

 

चार     संशयितांसह एका मांत्रिकाला अटक करण्यात आली अाहे. एक मांत्रिक मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाला. शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबाद रोडवरील एका वाहन बाजार कार्यालयात हा  प्रकार उघडकीस आला. आडगाव पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. सुधीर भोसले, चंद्रकांत जेजुरकर (अप्पा), तुषार चौधरी, संदीप वाकडे( मांत्रिक), निखिल पूर्ण नाव नाही (मांत्रिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.    


नालासोपारा येथे संबंधित ४४ वर्षीय महिला दोन मुलांसह राहते. मुंबई येथील एका रुग्णालयात ती सफाईचे काम करते. या महिलेच्या पतीचे २००७ मध्ये निधन झाले आहे. त्या वेळी नालासोपारा येथे घर विकत घेतले होते. २००४ मध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने घर लिलाव करून विक्री केले. सध्या महिला भाडेकरारावर राहते. तिने नातेवाइकांकडून सुमारे दहा लाख हातउसने घेतले आहेत. ते परत द्यायचे असल्याने नाशिक येथील परिचयातील संशयित प्रमोद सूर्यवंशी (रा. नाशिक रोड) यास तिने आपली अडचण सांगितली.

 

त्याने माझ्या ओळखीचा मांत्रिक आहे. ते मंत्राच्या शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात. मात्र, त्यासाठी एक कुमारिका मुलगी देवी म्हणून बसवावी लागेल. तसेच या पूजेसाठी मांत्रिकास व त्यांच्या सहकाऱ्यांना साठ हजार रुपये द्यावे लागतील. हे सर्व केल्यानंतर मांत्रिक एक कोटी रुपयांचा पाऊस पाडेल, असे  त्याने महिलेला सांगितले.  पैशांची गरज असल्याने महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.  तिने कळवा येथील पुतणीला पैशांच्या पावसाबाबत सांगितले. तिनेही पूजेसाठी येण्यास होकार दिला. बुधवारी महिलेसह तिची पुतणी नाशिक रोड येथे आली. त्यानंतर तिने संशयित सूर्यवंशी यास तीस हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने महिला व तिच्या पुतणीला पंचवटी येथील एका घरात थांबवत विधी सुरू केला होता.  


सतर्कतेने वाचली मुलगी   
नांदूर नाका येथे हाणामारी झाल्याने पोलिस कर्मचारी शेख व पाटील नांदूर नाक्याकडे जात होते. या वेळी देव मोटर्समधील वॉचमनने दोघांना आवाज दिला. एका मुलीवर अघोरी प्रकार सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर  शेख आत प्रवेश केला. असता विधी सुरू असल्याचे दिसले.

 

पांढरी साडी आणि नकली दागिन्यांचा शृंगार   
तरुणीला देवी बनवत पूजेसाठी लागणारे साहित्य लिंबू, तांब्या, हळद, कुंकू, आंब्याची पाने, तांदूळ, अंडे, हिरवा कपडा, पांढरी साडी, बांगड्या, पैंजण, कानातील रिंग, नेलपेंट, नारळ, पेढे, अत्तर, विड्या, बिंदी, अगरबत्ती या साहित्याची पूजा मांडली. वाहन बाजारात सुरक्षा रक्षकाच्या घरात पुतणीला पांढरी साडी व दागिने घालण्यास सांगितले. रात्री बारा वाजता मांत्रिक वाकडे याने दोघांना डोळे मिटून गप्प बसण्यास सांगितले. मंत्रोच्चारास सुरुवात केली. मात्र,  काही वेळात पोलिस आल्याने या मांत्रिकाचे बिंग फुटले. त्यानंतर पाेलिसांनी पूजेचे साहित्य जप्त केले.   

 

 

बातम्या आणखी आहेत...