आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकराेडला 54 अतिक्रमणे काढली, टपाल कार्यालय परिसराने घेतला मोकळा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नाशिकरोड परिसरातील अतिक्रमणांवरून मंगळवारी प्रभाग बैठकीमध्ये नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर महापालिकेने बुधवारी (दि. १८) पोलिस बंदोबस्तामध्ये शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सर्व अनधिकृत हातगाडे, टपऱ्या, दुकाने हटविली. काही व्यावसायिकांनी जेसीबीसमोर ठाण मांडले असता पोलिसांनी त्यांना हटविले. ही अतिक्रमणे काढल्यामुळे टपाल कार्यालयाने मोकळा श्वास घेतला अाहे.

 

रेल्वे स्थानक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मुक्तिधामसमोरील आणि बाजूचा परिसर, रेजिमेंटल प्लाझा, जामा मशिद, वास्को चौकासह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला वारंवार खोळंबा होतो. त्यामुळे सुमारे ५४ अनधिकृत मात्र कायमस्वरूपी मांडलेले हातगाडे आणि टपऱ्या अतिक्रमण विभागाने काढल्या. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला डाॅ. आंबेडकर पुतळा रोडवरील टपाल कार्यालयासमोर अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कपडे व्यावसायिकांनी विरोध केला. 'आमचे प्रथम पुनर्वसन करा मगच अतिक्रमण काढा', असे म्हणत त्यांनी जेसीबीसमोरच ठाण मांडली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे व उपनगरचे पोलिस निरिक्षक प्रभाकर रायते यांनी व्यावसायिकांना समजावून सांगितल्यानंतर अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यावसायिकांना दुकानातील सामान काढण्यासाठी वेळ दिला. त्यांचे सामान आवरण्यासाठीही कर्मचाऱ्यांनी सामाजिक भावनेतून मदत केली. तरीही काही व्यावसायिक अडेलटट्टूपणा करीत असल्याने अधिकाऱ्यांनी थेट जेसीबीद्वारेच अतिक्रमणे ताेडली. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुरुवातीला काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

 


पुढाऱ्यांच्या टपऱ्याही उद‌्ध्वस्त
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांच्या टपऱ्याही अतिक्रमण विभागाने हटविल्या. मात्र, येथील सराफांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण न काढताच मोहीम थांबविल्याने नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

 

हजला जायचे म्हणून दुकानात सामान भरले..
देवी चौक रस्त्यावरील टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या अगरबत्ती, अत्तर दुकानाचा मालक महापालिका अधिकारी काही वेळ देतील म्हणून दुकानाबाहेरील वस्तू दुकानात ठेवत होता. मात्र, अतिक्रमणामध्ये संपूर्ण दुकानच गेल्याने एक महिला रडतच 'हजला जायचे म्हणून मुलाला दुकानातील सामान खरेदी करून दिले अन‌् अतिक्रमण विभागाने हिरावून नेले', अशा शब्दांत आपले ग्राऱ्हाणे मांडत होती.

 

बातम्या आणखी आहेत...