आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना मालाचे पैसे राेख देत नाही, ताेपर्यंत नांदगावी लिलाव बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव- शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतीमाल खरेदीचे पेमेंट राेखीने द्यावे, अशा सूचना परवानाधारक व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. व्यापाऱ्यांनी त्यास असमर्थता दर्शविल्याने गुरुवारी शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते. शेतकरी अाणि संघटनांच्या मागणीनुसार याबाबत पुढील निर्णय होईपर्यंत बाजार समितीतील खरेदी-विक्रीचे व्यवहार बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. 


केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यावर शेतीमालाचे पेमेंट धनादेशाने अदा करण्याची नवीन पद्धत अमलात आली. ज्या दिवशी शेतकरी मालाची विक्री करेल त्याच दिवशीचा धनादेश देणे व ताे बँकेत वटलाच पाहिजे, असे अपेक्षित होते. परंतु काही व्यापाऱ्यांकडून पुढील तारखेचे धनादेश देणे, खात्यावर पैसे नसल्यामुळे ते बाउन्स होण्याचे प्रकार वाढले. न वटलेले धनादेश संबंधित शेतकऱ्यांना पोस्टाने मिळत. या सर्व प्रक्रियेत महिन्यापेक्षा जास्त कालावधी जात हाेता. त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असे. मागील महिन्यापासून तर किरकोळ रकमेचे चेकही बाउन्स हाेत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्यावर संबंधित व्यापाऱ्याला समज देऊन शेतकऱ्याला पैसे मिळवून दिले जात होते. परंतु चेक बाउन्स झाल्याची माहिती मिळेपर्यंत महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो, या गोष्टीचा फायदा काही व्यापारी जाणीवपूर्वक उठवतात व खात्यावर पैसे शिल्लक नसताना लिलावात सहभागी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते. असा शेतकरी व संघटनांचा मुख्य आरोप आहे. हा प्रकार थांबवायचा असेल, तर धनादेश पद्धत बंद करून रोखीने पैसे अदा करावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानुसार संचालक मंडळाने व्यापारीवर्गाला पत्र पाठवून रोखीने व्यवहार करावे, असे कळविले. त्यास असमर्थता व्यक्त करत शेतकऱ्यांना दिले जाणारे चेक बाजार समितीमार्फत देऊ म्हणजे सर्व व्यवहारांवर बाजार समितीची नजर राहील, असे व्यापाऱ्यांनी कळविले. संचालक व व्यापारी भूमिकांवर ठाम असल्याने लिलाव बंद आहेत.

 

चांदाेऱ्यातील शेतकऱ्याचा अाक्राेश 
- पत्रकार परिषद झाल्यावर बाजार समिती आवारात चांदोरा येथील शेतकरी सुर्वे यांनी धनादेश वटत नसल्याने संचालकांसमोर आक्रोश केला. संबंधित व्यापाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने बँकेतून पैसे काढत आहे, तेे कार्यालयात जमा करतो असे सांगितले. 
- तालुक्यातील बोलठाण व न्यायडोंगरी उपबाजारावर लिलाव नियमित सुरू आहेत. न्यायडोंगरीच्या व्यापाऱ्यांनी रोखीने पेमेंट देण्याच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. ही पद्धत नांदगावी का लागू हाेत नाही. 


हे अाहेत शेतकऱ्यांचे ठळक मुद्दे 
शेतीमाल विकल्यावर शेतकऱ्याने पैसे रोख मागितले तर व्यापारी त्याला तीन टक्के आडत कापून पैसे देतो. दहा हजारांचा माल विकल्यावर तीनशे रुपये वजा करून नऊ हजार सातशे रुपये दिले जातात अशा तोंडी तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहेत. धनादेशाने व्यवहार होत असल्याने या प्रकाराला चालना मिळत असल्याचे निदर्शनास अाणून देण्यात अाले. 


राेखीने व्यवहार करण्याच्या भूमिकेवर बाजार समिती ठाम 
व्यापाऱ्यांनी भूमिका मांडल्यावर गुरुवारी दुपारी संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. धनादेशांद्वारे व्यवहारात अनेक गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यानेच रोखीने व्यवहार करण्याची सूचना करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, चांदवड आदी मोठ्या बाजार समितीत जर रोखीने व्यवहार होत असतील तर मग नांदगावला काय अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच रोखीने पेमेंट दिले जात नाही तोवर लिलाव बंद ठेवण्याच्या आपल्या भूमिकेवर बाजार समिती ठाम असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला सभापती तेज कवडे, उपसभापती पुंजाराम जाधव, संचालक विलास आहेर, भास्कर कासार, एकनाथ सदगीर, राजेंद्र देशमुख दिलीप पगार, गोरख सरोदे, भाऊसाहेब काकळीज, बाळासाहेब कवडे, यज्ञेश कलंत्री, सचिव अमोल खैरनार आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...