आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित-मराठा एकी राज्याच्या हिताची; राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भीमा-कोरेगाव येथे दलित समाज कित्येक वर्षांपासून जातो. परंतु अात्ता त्यांच्यावर हल्ला करण्यामागे राजकीय स्वार्थींचा हात आहे. असा प्रकार समाजानेच हाणून पाडावा. मराठा-दलित एकीशिवाय राज्याला भविष्य नाही. राज्याच्या हितासाठी मी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 


काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मृती सोहळ्यानिमित्ताने नाशिकमध्ये आले असता, पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी मराठा-दलित ऐकी, दलितऐक्य, भाजप-सेना-आरपीआय एकी, नारायण राणेंचा भाजप प्रवेश अशा प्रश्नांवर मनमोकळी उत्तरे दिली. भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर पाळण्यात आलेल्या बंदमध्ये मराठा समाजानेही सहकार्य करत जो सहभाग नोंदविला, त्यामुळे त्यांचे मी अाभार मानतो. खासदार संभाजीराजेंनी साजऱ्या केलेल्या शिवजयंती उत्सवातही मी दिल्लीत सहभागी होताे. मराठा दलित एकत्रिकरणासाठीही समता रॅली आम्ही काढल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मी दलित पँथरमध्ये असताना घेतलेली आहे. मराठा-दलित एकमेकांच्या मदतीशिवाय राजकारणच काय पण समाजकारणही करू शकणार नाही. म्हणून त्यांनी एकत्र यावे. मी त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष तबरेज शेख यांनी आठवलेंचा सत्कार केला. प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, विश्वनाथ काळे, काकासाहेब खंबाळकर, फकिरा जगताप, पवन क्षीरसागर, अविनाश शिंदे उपस्थित होते. 


काँग्रेसमुळे देशात जातीवाद रुजला 
भाजपच्या काळात डॉ. आंबेडकरांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात जाणारा मी पहिलाच दलित आहे. काँग्रेसने पाच वर्षे मला तिष्ठत ठेवले. ७० वर्षांत काँग्रेसने केवळ जातीवाद वाढविण्याचेच काम केले. तीन दलित नेत्यांना राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिले. धर्मनिरपेक्षतेची धोरणे राबविल्यानंतरही होणारा आरोप हे काँग्रेसचे जातीवादाचे लक्षण असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. 


अाठवलेंकडून याबाबतही माहिती 
 काळाराम प्रवेश कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हे सामाजिक न्यायासाठीच. 
 भीमा-कोरेगाव घटनेचे सूत्रधार भिडे, एकबोटेंच्या चौकशीचा ३ महिन्यांत समितीकडून अहवाल. 
 महाराष्ट्र बंदवेळी दाखल खोटे गुन्हे माघारीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा. 
 दलित ऐक्यास माझा पाठिंबा. नेतृत्व भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी करावे. 


शिवसेना-भाजपसाठी ठाकरेंची घेणार भेट 
शिवसेना-भारतीय जनता पक्षाने राज्यात एकत्रच निवडणूक लढवावी. देशात २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींचाच करिश्मा चालणार असल्याने शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय राज्यात सत्ता राखता येणार नाही. म्हणून मी स्वत: प्रयत्न करत आहे. त्याबाबत संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी चर्चाही केली आहे. पुढील आठवड्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी वेळ दिल्यास भेट घेऊन समेट घडवून आणणार आहे.

बातम्या आणखी आहेत...