आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्त मुंढेंच्या अडवणुकीविरोधात भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर शनिवारी महापालिकेतील कामकाजादरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून होणाऱ्या अडवणुकीसंदर्भात नगरसेवकांनी उघडपणे गाऱ्हाणे मांडल्यानंतर भाजपच्या तिन्ही आमदारांनी एकजूट दाखवत टॉप गिअर टाकून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा कोटीच्या स्थानिक विकास निधी दोन कामे सुचवण्याचे अधिकार मुंढे यांनी कसे हिरावले यासंदर्भात तक्रारी केल्या. मुख्यमंत्र्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत आमदारांकडून सुचवलेल्या कामांच्या याद्या मागवल्या असून आता काय निर्णय होतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे. 


शनिवारी पालकमंत्री महाजन यांच्यासमोर बैठकीत आमदारांपासून तर नगरसेवकांपर्यंत किंबहुना भाजपच्या नेत्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्र्यांनी आठ दिवसात महत्त्वाच्या प्रकरणांबाबत निर्णय देईन, असे सूचक संकेत दिले होते. याच बैठकीत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील विविध विकासकामांसाठी प्रत्येकी दहा कोटीचा विशेष आमदार निधी दिल्यानंतर त्यातून सुचवलेल्या कामांना ब्रेक लावत आयुक्तांनी मनमानीद्वारे पाण्यासाठी हा निधी वळवल्याची गंभीर तक्रार आमदारांनी केली होती. आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे तिघे आमदार एकत्रितरित्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही स्पष्ट केले होते. एवढेच नाही तर आमदार निधीमधून महापालिका क्षेत्रात विकास कामे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत न करता महापालिका सक्षम प्राधिकरण असल्यामुळे याच यंत्रणेमार्फत करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यास भाजपाचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी जाहीररित्या हरकत घेत पालिकेमार्फत कामे होण्यास विलंब लागतो, असाही दावा केला होता. 


दरम्यान स्थानिक पातळीवर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सानप, फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी मुंढेंपुढे विकास कामांच्या याद्या सादर करून बघितल्या. मात्र, पालिकेच्या निधीतील कामांप्रमाणेच आमदार निधीतील कामांना गरज, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता ही त्रिसूत्री लावतानाच पाणीपुरवठा व मलनि:सारण कामासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचा दणका दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विशेष निधी, त्याचप्रमाणे आमदार निधीतील कामात होणारा हस्तक्षेप किंबहुना अधिकारावर होणाऱ्या अतिक्रमणाविषयी अखेर आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत विकासकामांच्या याद्या मागवल्या आहेत. 


मुख्यमंत्र्यांनी मागवले विकासकामांचे प्रस्ताव 
मुख्यमंत्र्यांनी दिलेला १० कोटींचा विशेष निधी गरजेनुसार कोठे खर्च करायचा याबाबत अधिकार आमदारांना आहे. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार हा निधी अन्यत्र वळण्याची भूमिका घेतली आहे. आमदारांच्या अधिकारावर गदा आणणारी ही बाब अत्यंत गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांनी विकासकामांच्या याद्या मागविल्या असून तत्काळ यादीही दिली गेली. 
- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम 

बातम्या आणखी आहेत...