आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीगिरी: चहापाणी, पुष्पगुच्छ घ्या पण घरकुलांची कामे तातडीने करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात बांधकाम हाेत असलेल्या घरकुलांबाबत विविध तालुक्यांत असमाधानकारक काम असलेल्या ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. नरेश गिते यांनी अापल्या कक्षात बोलावून स्वत: चहा व गुलाबपुष्प देत त्यांचे आदरातिथ्य केले. इतकेच नव्हे तर ग्रामसेवकांसमोर हात जोडत घरकुलांचे काम पूर्ण करण्याची विनंती केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या या अनपेक्षित पाहुणचाराने जिल्हाभरातील सुमारे ४५ ग्रामसेवक चांगलेच खजील झाले हाेते. 


जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात घरकुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत चांगले काम करून देशात १०६ वा क्रमांक मिळविला आहे. मात्र २०१६-१७ पासून अनेक घरकुल अपूर्ण आहेत. याबाबत वारंवार आढावा घेऊन, सूचना देऊनही संबंधित ग्रामसेवकांच्या कामात सुधारणा होत नसल्याने डॉ. नरेश गिते यांनी गांधीगिरीच्या मार्गाचा अवलंब करत ग्रामसेवकांना घरकुलांचे उर्वरित कामासलावण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त घरकूल शिल्लक असलेल्या ४५ ग्रामसेवकांना बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेत आमंत्रित केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपला आढावा घेतील व कार्यवाही करतील अशी भिती मनात घेऊन आलेल्या ग्रामसेवकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. डॉ. नरेश गिते यांनी सर्व ग्रामसेवकांना गुलाबाचे फूल व चहा देत काम कमी असल्याबाबत त्यांचे जागेवर जाऊन अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या कृतीने खजील झालेल्या ग्रामसेवकांनी घरकुल कधी पूर्ण करणार याबाबत लेखी लिहून दिले. यापुढेही कोणत्याही योजनेत कमी काम असलेल्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचा पाहुणचार करणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. 


यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, बाबा देसले उपस्थित होते. मी कुणाचे नुकसान करण्यासाठी काम करीत नसून आपल्या हातून एखाद्या गरिबाच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असेल तर त्यासारखे पुण्याचे काम नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सर्व ग्रामसेवकांनी प्रामाणिकपणे घरकुलाचे काम करण्याचे आवाहन डॉ. गिते यांनी केले. 


घरकुल अनुदान त्वरित द्यावे 
नाशिक शासनाकडून घरकुल बांधकामाचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. मात्र, एफटीओ (अनुदान वितरण आदेश) तयार होऊनही बँकेच्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत हाेते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी बुधवारी (दि. २०) महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय अधिकारी बी. एस. तावरे यांच्याशी चर्चा करून तत्काळ सदरचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. 


जिल्ह्यात घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. घरकुल बांधकामाचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येताे. यासाठी अनुदान वितरण आदेश बँकेकडे जमा करून देखील लाभार्थ्यांना निधी वर्ग करण्यात येत नाही. याबाबत जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेच्या शाखांना विचारणा करूनही कार्यवाही होत नसल्याने डॉ. गिते यांनी क्षेत्रीय अधिकारी बी. एस. तावरे यांच्याकडे तक्रार करून सदरचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली. बँकेकडून कार्यवाही करण्यात येत असून दोन दिवसांत सर्व निधी लाभार्थ्यांकडे वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन तावरे यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...