आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर प्रस्ताव रखडल्याने भुजबळांची नाराजी, जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या तीव्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- येवला-नांदगावसह जिल्ह्यातील पूर्व भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. शासनाने चार दिवसांत टँकरच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे बंधनकारक केले असतानाही नांदगावमधील चार ठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी २४ मे अर्थात २१ दिवसांपूर्वीच प्रस्ताव देऊनही ते अद्याप सुरू झालेले नाही. हा नागरिकांवर अन्याय असल्याचे सांगत अामदार छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या गावांना टँकर तत्काळ सुरू करावे. टँकरच्या मुदतवाढीस आताच परवानगी घ्यावी. शेतकऱ्यांना खरिपासाठी पुरेसे पीककर्ज उपलब्ध करावे, बियाणे, खते यासह मांजरपाडा, दरसवाडीसह जिल्ह्यातील इतर रखडलेल्या प्रकल्पांची त्वरित पूर्ती करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भुजबळ यांनी चर्चा केली. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. 


अडीच वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात आलेले अामदार छगन भुजबळ यांनी विविध प्रश्न, विकास प्रकल्प, शेतकरी, विद्यार्थी अशा सर्वच समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी भेट घेत चर्चा केली. प्रामुख्याने पाणीपुरवठ्याच्या योजनांकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील येवला, नांदगाव, सिन्नर, चांदवडसह पूर्व भागातील तालुके टंचाईग्रस्त आहे. तेथे आताच पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे. निम्मा जून उलटल्यानंतरही पाऊस नसल्याने पाणीटंचाई तीव्र होईल. पाऊस पडल्यानंतरही तत्काळ पाणीसाठा वाढणार नसल्याने ३० जूनअखेर संपणारी टँकरची मुदत वाढवून घ्यावी. जेणेकरून मुदत संपल्यानंतर शासन आदेशाच्या प्रतीक्षेत नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागणार नाही. मांजरपाडा प्रकल्पाच्या कामाचावेग वाढवावा. यंदाच त्याद्वारे जिल्हावासीयांना पाणी उपलब्ध करून द्यावे. 


ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर दोन महिने ते दुरुस्त केले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ट्रान्सफॉर्मर तीन दिवसांत बसविण्यात यावे. लोडशेडिंग वेळ वगळता वीजपुरवठा खंडित करू नये. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, आमदार सुधीर तांबे, अपूर्व हिरे, नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, माजी आमदार जयवंत जाधव, दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, संजय चव्हाण, श्रीराम शेटे, डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, दिगंबर गिते, गोकुळ गिते, ज्ञानेश्वर गायकवाड, चिन्मय गाढे अादी उपस्थित होते. 


जातपडताळणी मुदत वाढवावी 
दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे दाखले तसेच जातवैधता प्रमाणपत्रांची त्याचवेळी सादर करण्याची अट शिथील करावी. त्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी. याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश करत दाखले पोस्टासह ऑनलाइन वितरण करण्याचीही मागणी भुजबळ यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे अाश्वासन दिले. 


जळगाव प्रकरणाचा निषेध 
जामनेर येथे दाेघा मागासवर्गीय मुलांना नग्न करून मारहाणीची घटना घडली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात वाईट घटना घडली आहे. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणेच्या नावाखाली तो शिथिल केला जात आहे. मग या घटनांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या शासनाने ते थांबविले पाहिजे. या प्रवृत्तींचा बिमोडसाठी सर्वच स्तरांतून त्याचा निषेध करण्याची अपेक्षा आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...