आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेटी पळवापळवी का झाली, प्रकल्प राेखण्यासाठीच प्रयत्न झाले; भुजबळांचा पालकमंत्र्यांना चिमटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूर धरणात काेट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या बाेटक्लबमधील बाेटी नंदुरबारमधील सारंगखेडा येथे चेतक फेस्टिव्हलच्या निमित्ताने पळविल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुळातच बाेटी का नेल्या हेच कळत नाही. करायचे हाेते तर वेगळेही करता अाले असते. मुळात हा प्रकल्पच राेखण्यासाठी प्रयत्न झाले. दुर्दैवाने असे हाेत असताना नाशिककरांनी अावाज उठवला नाही अशी खंत व्यक्त करीत अप्रत्यक्षपणे पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना चिमटे घेतले. 


अडीच वर्षांनंतर भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांचे अामदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिकमध्ये अागमन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकारांच्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. नाशिकमध्ये दाेन वर्षांत काय बदल दिसले असे विचारले असता त्यांनी अद्याप संपूर्ण नाशिकचे दर्शन झालेले नाही. कार्यकर्त्यांच्या गर्दीत नीट बघू शकलाे नाही असे उत्तर दिले. तुमच्या ड्रीम प्राेजेक्टला पुढे गती मिळू शकली नाही किंबहुना बाेटक्लब, सप्तशंृग गडावरील फ्युनिक्युलर ट्राॅलीचे रखडलेले उद्घाटन याबाबत विचारले असता त्यांनी देशातील सर्वोत्तम बाेटक्लबपैकी एक नाशिकचा प्रकल्प अाहे. या ठिकाणी ३० ते ४० बाेटी असून त्या प्रदूषणमुक्त हाेत्या. दुर्दैवाने त्या बाेटी अन्यत्र नेल्या गेल्या. मुळात या बाेटी नेण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनेही संबंधितांना अाणता अाल्या असत्या. हे घडत असताना नाशिकच्या लाेकांनी अावाज उठवला नाही. मुळात हा प्रकल्प रखडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, असाही अाराेप त्यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता केला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांची सकाळी भेट घेतल्यानंतर बऱ्याच प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार अाहे. त्यात बाेटक्लबबाबतही चर्चा हाेईल, असेही स्पष्ट केले. 


मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर उद‌्घाटनाला यावे
सप्तशंृग गडावरील फ्युनिक्युलर ट्राॅली देशातील पहिला प्रकल्प अाहे अशी माझी माहिती अाहे. राेप वे व अन्य पर्यायांपेक्षा हा वेगळा प्रकल्प असून, तो जमिनीलगत असल्याने कमी धाेका अाहे. ज्यांना गडावर पायी चढून जाणे शक्य नाही त्यांना अाता सप्तशंृगीदेवीचे दर्शन घेता येणार अाहे, असे भुजबळ यांनी सांगितले. 


या प्रकल्पाचे लाेकार्पण रखडल्याबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर येऊन उद‌्घाटन करावे. पूर्ण झालेला प्रकल्प अशा पद्धतीने प्रतीक्षेत ठेवणे याेग्य नाही अाणि मला बाेलावले तर उद‌्घाटनाला नक्की येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, भुजबळ यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्याचा ठराव केल्याबद्दल त्यांनी सप्तशंृगगड ग्रामपंचायतीचे अाभार मानले. 


उशिरा का हाेईना विमानसेवा सुरू झाली यातच अानंद

जवळपास चार वर्षांहून अधिक काळ नाशिकच्या अतिशय सुंदर अशा विमानतळाला लाेटला अाहे. त्यानंतरही येथे विमानसेवा स्थिरावू शकलेली नाही यासंदर्भात विचारले असता, भुजबळ यांनी अाता नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू हाेत असल्याची बाब उशिराने का हाेईना मात्र अानंद देणारी असल्याचे मत व्यक्त केले. मुळात, नाशिकहून हैदराबाद, सुरत-दिल्ली, मुंबई-बंगळुरू अशा हाेपिंग फ्लाइट दिल्यास नाशिकच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल, असाही विश्वास व्यक्त केला. 


अडीच वर्षांनंतर अागमन; जाेरदार शक्तिप्रदर्शन 
भुजबळ यांचे दाेन वर्षांनंतर नाशिकमध्ये अागमन झाल्यानंतर जाेरदार स्वागत व जल्लाेष करण्यात अाला. पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दाैऱ्याला सुरुवात झाली. यावेळी ढाेल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची अातषबाजी करीत तसेच समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे फडकावत कार्यकर्ते जल्लाेष करीत हाेते. गाडीतील टपावरून भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सिडकाेत अनेक ठिकाणी सत्कार स्वीकारत ते गणेशवाडी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास तसेच शिवाजीराेडवरील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पाेहाेचले. या ठिकाणी पहिल्या मजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. 


वादग्रस्त पदाधिकाऱ्यांची पुन्हा भाऊगर्दी 
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकाऱ्यांची भुजबळ यांच्याभाेवती पुन्हा गर्दी झाल्याची बाब चर्चेचा विषय हाेता. भुजबळ सत्तेवर असताना यातीलच काही पदाधिकाऱ्यांची वाढती ऊठबैस राेषाचे कारण ठरले हाेेते. यातील काही पदाधिकाऱ्यांवर अलीकडेच गंभीर गुन्हेही दाखल अाहेत. टाेळ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी करणे, फसवणूक करणे असे गंभीर गुन्हे अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...