आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलीकर लाच प्रकरणात फिर्यादीची मूळ तक्रारच संशयास्पदरित्या गायब; गुन्हा दाखलचे अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीशी संबंधित दाेषाराेपपत्रातील फिर्यादीची मूळ तक्रारच संशयास्पदरित्या गायब झाली अाहे. एवढेच नव्हे तर काेणतीही स्वाक्षरी नसलेली बनावट तक्रार कागदपत्रांमध्ये दाखल झाल्याचे लक्षात अाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. विशेष म्हणजे, संबंधित सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण दुसऱ्या न्यायालयाकडे तडकाफडकी वर्ग करण्यात अाले अाहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार उघडकीस येत असतानाच नाशकात ठेकेदाराकडून त्याचे देयक मंजूर करण्याच्या माेबदल्यात २० हजारांची लाच घेताना चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना रंगेहाथ पकडण्यात अाले हाेते. २ मे २०१३ राेजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बांधकाम विभागच्या कार्यालयातच सापळा रचून वाघ यांना लाच घेताना पकडले हाेते. पथकाने चिखलीकर व वाघ यांच्या निवासस्थानी झडतीसत्र राबविले असता काेट्यवधींचे घबाड हाती लागले हाेते. या दाेघांनाही न्यायालयाने सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावत त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली हाेती. दरम्यान, काही दिवसांत दाेघांना जामीनही मंजूर झाला हाेता. काेट्यवधींच्या मालमत्तेमुळे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर अाल्याने राज्यभरात खळबळ उडाली हाेती. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत या प्रकरणाचे धागेदाेरे असल्याचे बाेलले जात हाेते. सदर प्रकरणात एसीबीने चिखलीकर व वाघ यांच्याकडे सापडलेल्या काेट्यवधींच्या मालमत्तेप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांविराेधातही अपसंपदेचा गुन्हा दाखल केला हाेता. यात, चिखलीकर यांची पत्नी व वडील मधुकर गंगाधर चिखलीकर यांचाही सहभाग हाेता. 


या प्रकरणाचे दाेषाराेपपत्र अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल झाले असून, चिखलीकर यांच्या वतीने त्यांच्याकडे सापडलेली मालमत्ता ही वडिलाेपार्जित असल्याचा दावा करण्यात अाला. त्याचबराेबर त्यांचे वडीलही शासकीय सेवेत अधिकारी असल्याने त्यांचे मूळ वेतन व त्यातून जमविलेली संपत्ती, कुटुंबीयांची शेती असल्याचे म्हणणे मांडत पाेलिसांकडे जमा असलेली सुमारे १४ काेटींची मालमत्ता परत मिळण्याचा अर्ज करण्यात अाला हाेता. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. टी. पांडे यांच्यासमाेर सुनावणी हाेऊन न्यायालयाने चिखलीकर यांच्या वडिलांची मालमत्ता परत करण्याचे एसीबीला अादेश दिले हाेते. या निर्णयावर एसीबीने उच्च न्यायालयात धाव घेतली अाहे. सदर प्रकरणाबराेबरच चिखलीकर व वाघ यांच्याविराेधातील लाचेच्या गुन्ह्याची सुनावणी सुरू झालेली असतानाच दाेषाराेपपत्रात एसीबीने दाखल केलेली मूळ तक्रारदार इरफान शेख यांची फिर्याद शासकीय पंचाच्या साक्षीने पुराव्यानिशी सादर केली हाेती. 


या तक्रारीवर निशाणी ६७ प्रमाणे नाेंदही झाली हाेती. हीच तक्रार अचानकरित्या दाेषाराेपपत्रातून गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार सरकारी वकील व एसीबीच्या समाेर अाला. हा महत्त्वाचा दस्तावेज गहाळ झाल्यानंतर त्याच ठिकाणी नवीन मूळ तक्रारीत बदल करून त्यावर कुठलीही स्वाक्षरी, शिक्का नसलेला तक्रार अर्ज लावून देण्यात अाल्याची गंभीर बाबही उघडकीस अाली अाहे. 


जिल्हा व प्रधान सत्र न्यायालयाकडून दखल 
लाचेच्या काेट्यवधींच्या प्रकरणात अशाप्रकारे न्यायालयाच्या अावारातून मूळ तक्रारच गायब हाेत असल्याच्या प्रकाराची जिल्हा व प्रधान सत्र न्यायालयाने गंभीर दखल घेत तातडीने पाेलिस अायुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. यांसदर्भात, न्यायालयाकडून निबंधकांनी सरकारवाडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली असून, चाेरी अाणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा दुजाेराही पाेलिसांनी दिला. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यात अाली असली, तरी ज्या न्यायालयात हे प्रकरण सुरू हाेते त्या संबंधित शिपायापासून ते वरिष्ठ लिपिक, कर्मचाऱ्याची चाैकशी हाेण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली. 


काेण अाहे चिखलीकर ? 
मूळचे नांदेड जिल्ह्यातील चिखलीचे रहिवासी असलेल्या सतीश चिखलीकर यांनी सुरुवातीला सांगली येथे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण हाेऊन १९९४ पासून ते बांधकाम खात्यात रुजू झाले. २ मे २०१३ राेजी कार्यकारी अभियंतापदावर कार्यरत असताना २२ हजारांची लाच घेताना त्यांना पकडण्यात अाले. त्यानंतर एसीबीच्या तपासात त्यांची राज्यभरात ७८ ठिकाणी मालमत्ता अाढळून अाली. सुमारे तीन काेटींची राेकड व ४० ताेळे साेने अशी सुमारे १७ काेटींची मालमत्ता जप्त करण्यात अाल्याने चिखलीकर चर्चेत अाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...