आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ हवामानामुळे कांद्याचा वांधा, पाऊस झाल्यास द्राक्ष, गव्हाला फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्हे असून, दक्षिण तामिळनाडू आणि केरळसह राज्यातही पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने बळीराजाचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सध्या द्राक्ष आणि गहू काढणीचा हंगाम सुरू अाहे.

 

केवळ ढगाळ वातावरण राहिल्यास द्राक्ष व गव्हाला फारसा फटका बसणार नाही. परंतु, गारपीट झाल्यास द्राक्षांना तडे जाण्याबरोबरच गव्हालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कांद्यावर बुरशी आणि कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढेल. काही शेतकऱ्यांनी याचा धसका घेऊन द्राक्ष काढणीचा वेगही वाढविला आहे. दरम्यान, पावसाने अवेळी धिंगाणा घालायला नको म्हणून शेतकरी देवाला साकडेही घालत होते. गुरुवारी नाशिकमध्ये किमान तापमान दाेन अंशाने घटून १९.८ तर कमाल तापमान ३ अंशाने घटून ३०.५ अंशांवर होते.

 

यामुळे ढगाळ वातावरण
अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा हा केरळकडे सरकला आहे. हा पट्टा १३ ते १४ किलोमीटर प्रति ताशी वेगाने गुरुवारपर्यंत सरकत होता. त्यामुळे समुद्रात कमी तीव्रतेचे वादळ निर्माण होण्याचे चित्र दिसत नाही. या बदलामुळे नाशिक जिल्हयात ढगाळ वातावरण रहाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

 

शेतकऱ्यांची चिंता वाढली
ढगाळ हवामानाचा द्राक्ष, कांदा, हरभरा तसेच शाळू पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ओझर परिसरात अधिक बागा विस्तारल्या आहेत. सर्वच बागांमध्ये यंदा द्राक्षांचा बहर उत्तम आहे. आतापर्यंत निफाड तालुक्यातील २५ ते ३० टक्के बागांमधील द्राक्षांचे हार्वेस्टिंग झाले आहे. साधारणतः फेब्रुवारीपर्यंत जमिनीतील ओल कायम असते. मार्चपासून जमीन तापते. जमीन जेवढी तापेल तेवढे पावसाचे पाणी मुरते. त्यामुळे पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात पिके अधिक चांगली येतात. यंदा मात्र मार्चचा दुसरा आठवडा सुरू होऊनही ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


कांद्यावर प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे करा : जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तसेच कधी वाढत्या तापमानामुळे कांद्यावर बुरशीजन्य आणि जीवानूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कांदा पातीवर जांभळा करपा, तपकिरी करपा येतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी २ ग्रॅम प्रति लिटर, कॅब्रिओटॅप ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा नेटिव्हो १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात अधिक चिकट द्रव्य करून फवारणी करावी. वातावरण निवळल्यानंतर खुरपणी करून तण नियंत्रण करावे व आंतरमशागत करून जमीन भुसभुशीत करून हवा खेळती ठेवावी, असे राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानच्या पीक संरक्षण विभागातील तांत्रिक अधिकारी मनोजकुमार पांडे व कीटकशास्त्राचे तांत्रिक अधिकारी मनोजकुमार पाठक यांनी सांगितले.

 

हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
हार्वेस्टरने गहू काढणीसाठी प्रति एकरी १६०० रुपयांप्रमाणे मजुरी घेतली जाते. परंतु, बुधवारपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज निर्माण झाल्याने हार्वेस्टरचालकाच्या मागे गहू उत्पादकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:हून १६०० एेवजी दाेन हजार रुपये प्रति एकरी दर देतो, परंतु आमचे गहू प्रथम काढणी करून द्या, अशी मागणी करत आहे.

 

२५% बागांत काढणी बाकी, फवारणी करता येणार नाही
जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात असून अद्याप २५ ते ३० टक्के बागा शिल्लक आहेत. पाऊस पडला तर सोनाका, माणिक चमन आणि कागद लावलेल्या निर्यातक्षम थाॅमसन द्राक्षांना तडे जाऊ शकतात. सध्या द्राक्षांत साखर उतरलेली असल्याने कोणत्याही औषधांची फवारणी करता येणार नाही. कागद लावलेले द्राक्ष हे नाजूक असल्याने पावसामुळे कागद खराब होऊन मालाची चमक कमी होईल तसेच नंतर सूर्यप्रकाशामुळे मण्यांना तडे जास्त जाण्याची शक्यता आहे. गव्हालाही गारपिटीचा फटका बसेल.

 

उगावला तुरळक पाऊस, शीतगृहाचा पर्याय
निफाडसह तालुक्यातील उगाव, शिवडी, नांदुर्डी, रानवड, सोनेवाडी, वनसगाव, खडकमाळेगाव, सारोळे, सावरगाव भागात गुरुवारी सकाळी तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ हवामानाने द्राक्ष उत्पादक हबकले आहेत. पाऊस झाल्यास द्राक्षमणी तडकून व्यापारी द्राक्षाची कमी दरात खरेदी करतील. त्यामुळे द्राक्षमाल साठवणुकीसाठी शीतगृहाचा पर्याय शेतकऱ्यांना आहे. भावात वाढ झाल्यानंतर द्राक्षे बाजारात आणता येतील. द्राक्षांवर चिकट्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु, द्राक्ष पक्व झाल्याने सध्या प्रतिबंधात्मक फवारणी करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...