आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : लक्षवेधी येवला !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाची उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक अक्षरश: एकतर्फी पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी होताना नरेंद्र दराडे यांनी घसघशीत मताधिक्य पदरात पाडून घेत अगदी सहजरीत्या आमदारकीवर ताबा मिळवला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बंधू किशोर यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एका दमात अन् एकहाती जिंकली. दोन्ही निवडणुकांच्या केंद्रस्थानी 'पैसा' अन् 'पैठणी' होती. निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप, धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती, दबाव तंत्र, दारूच्या पार्ट्या, सामिष जेवणावळी, जातीय समीकरणे, हाणामाऱ्या, शिवीगाळ हे सर्वकाही ओघानेच येते. त्यात नवीन काही राहिलेले नाही. 


साधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी मतदारांना विविधांगी आमिष दाखवले जाते अन् उमेदवारांच्या आमिषाला बहुसंख्य मतदारही भुलतात हे कटू असले तरीही उघड सत्य आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक त्याला अपवाद कशी राहू शकते? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील चर्चेच्या माध्यमातून म्हणा की, आरोप-प्रत्यारोपाच्या रूपाने कोणत्या उमेदवाराने कितीची 'ऑफर' दिली अन्् प्रत्यक्षात 'टोकन' किती दिले याचीही वाच्यता झालीच होती. तोच प्रकार शिक्षकवृंदाच्या निवडणुकीतही झाल्याचा बोलवा आहे. आता कोणी पैठणी घेतली की पैठणीच्या बदल्यात रोख रक्कम घेतली याचा पुरावा कोण कोणाला देणार? हा शेवटी ज्याच्या-त्याच्या मानसिकतेचा वा सद््सद््विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, समाजाची नवी पिढी घडवण्याचे अतिशय संवेदनशील कार्य ज्यांच्या हातून होते अथवा ज्यांच्याकडे आदर्शवत म्हणून बघितले जाते त्या गुरुजींच्याच वर्गाचे रूपांतर 'तमाशात' होणार असेल तर समाजाने कोणाकडे बघायचे? पिंजरा चित्रपटातील मास्तरने उगाचच, 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' असे म्हटले नव्हते. या निवडणुकीतही असं कुठे तरी अंधाऱ्या कोपऱ्यात काही तरी जळत असेल, त्यामुळे धूर हा निघणारच. 


एक बाब निश्चित अधोरेखित झाली आहे की, अन्य निवडणुकांप्रमाणे शिक्षक मतदारसंघालाही वाळवी लागली आहे. दुसऱ्या अंगाने विचार केला तर एकाच घरातील दोन भाऊ आमदार झाले आहेत. हा प्रसंग तसा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच म्हणता येईल. हा इतिहास घडवला तोही येवला या गावाने. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज हे एकाच वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत कार्यरत आहेत. वडील येवल्याचे, तर मुलगा शेजारच्या नांदगावचा आमदार आहे. दराडे बंधूही विधान परिषदेत एकाच वेळी काम करतील. राज्यात अन्यत्र अशी स्थिती कितपत असेल हे सांगता येणार नाही, पण पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्याने हे नवे समीकरण राज्यापुढे ठेवले आहे. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात येवला हे नाव लक्षवेधी राहिले आहे. 


येवला हा मतदारसंघ अर्थात तालुका कायमच दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. पिण्याच्या पाण्याचे शेकडो टँकर गावागावात पाणी वाटप करत फिरायचे. पिकांची स्थितीही जेमतेम. सर्वत्र रखरखाट असा एकेकाळी येवल्याचा चेहरामोहरा होता. छगन भुजबळ यांनी येवल्यातून दशकभरापूर्वी उमेदवारी केली अन्् चित्र पालटायला सुरुवात झाली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे उभे राहिले, पाण्याच्या साठवणुकीसाठी ठिकठिकाणी बंधारे बांधले गेले, तालुकास्तरावरील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये एका छताखाली आणली गेली, क्रीडा संकुल, जिल्हास्तरीय उप ग्रामीण रुग्णालय, पैठणी क्लस्टर, तलावांचे आधुनिकीकरण असे एक ना अनेक उपक्रम राबवण्याचा सपाटा भुजबळांनी लावून दिला होता. पर्यटन खात्याचा पदभार सांभाळत असताना येवला व नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर असो की येवल्यानजीकचे कोटमगाव देवीचे स्थानमाहात्म्य लक्षात घेता त्याचा केलेला विकास यामुळे एकेकाळी भुजबळ पॅटर्नचा बोलबाला होता. त्यानंतर दिवस पालटले, भुजबळांच्या नशिबी शनीचा फेरा सुरू झाला अन् त्यांच्यासोबत पुतण्या समीरला सव्वादोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. 


अद्याप 'ईडी'मार्फत सुरू असलेला चौकशीचा फेरा शांत झालेला नाही. एक पाय आत, एक पाय बाहेर अशी काका-पुतण्यांची अवस्था आहे. पण भुजबळांच्या बाबतीत न्यायालयीन अथवा चौकशीच्या पातळीवर क्षुल्लक घडामोड झाली तरी त्याची बातमी होते. तुरुंगाबाहेर आल्यानंतर ज्या रीतीने जल्लोष झाला, स्वागताचे फलक झळकले ते तात्त्विकदृष्ट्या योग्य की अयोग्य ही बाब सोडली तर भुजबळांचा येवला तालुका वा मतदारसंघच लक्षवेधी राहतो. तो जसा भुजबळांमुळे या अगोदरपासून चर्चेच्या केंद्रस्थानी होता, तसाच या पुढच्या काळात आमदारद्वय दराडे बंधूंनी एका महिन्याच्या आत विधान परिषदेत प्रवेश केल्यामुळे राहू शकेल. काँग्रेस, राष्ट्रवादी अन्् उमेदवारीसाठी शिवसेनेचा निव्वळ आश्रय न घेता एकावर एक फ्री या पद्धतीने दोघे जण आमदार झाल्यामुळे येवला नक्कीच लक्षवेधी ठरला आहे. 

 

- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...