आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. हुसेन रुग्णालयाबाहेरील फरशीवरच प्रसूती, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अशीच मानवतेला काळिमा फासणारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निर्दयी कामकाज समोर आणणारी घटना घडली. या रुग्णालयात आलेल्या महिलेला डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाबाहेरील फरशीवरच प्रसूत व्हावे लागले. तसेच नुकत्याच जन्म झालेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यासंदर्भात महिलेच्या पतीने महापालिकेच्या आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना व आरोग्य उपसंचालकांना यासंदर्भात तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

महापालिकेची रुग्णालये आणि तेथील आरोग्यसेवेबद्दल सध्या नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकदा नागरिक, नगरसेवकांनी ताशेरे ओढूनही निर्ढावलेले डॉक्टर, कर्मचारी काही सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.


महापालिकेच्या मायको रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीबाबत घडलेल्या घटनांबाबत अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नसताना त्यात आता पुन्हा नवीन प्रकरण समोर आले आहे. इंदिरानगर भागात राहणाऱ्या रिजवान रफिक शहा यांनी महापालिकेच्या आयुक्तांसह जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीला १० जुलै रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नव्हते, तसेच पत्नीला प्रचंड वेदना होत असतानाही तिथे असलेल्या नर्सने प्रसूतीसाठी वेळ असल्याचे सांगून बेडवर झोपवून ठेवले. यावेळी त्यांच्या पत्नीला प्रसूतीकळा तसेच ब्लडिंग सुरू झाल्याचे नर्सला सांगूनही तिने डॉक्टरांना बोलाविले नाही. तसेच 'प्रसूतीसाठी वेळ आहे असे सांगत डॉक्टर सकाळी येतील', असे सांगून झोपण्यासाठी निघून गेली. दरम्यान, रिजवान शहा यांच्या पत्नीला तीव्र वेदना झाल्याने त्या हॉस्पिटलच्या खाली उतरल्या व तिथे असलेल्या फरशीवरच पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास प्रसूत झाल्या. मात्र, तरीही तेथील नर्सने शहा यांची पत्नी व नवजात बाळाची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही तसेच डॉक्टरांनाही कळविले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शहा यांच्या वतीने महापालिकेच्या आयुक्तांसह वैद्यकीय अधीक्षक, जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आली आहे.

 

चौकशी करून कारवाई करावी..
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच हलगर्जीपणामुळेच प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील नर्सने जर या प्रसूतीसंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले असते तर अशी घटना घडली नसती. त्यामुळे संबंधित नर्स, हॉस्पिटलच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करून दोषी नर्स व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जेणेकरून गोरगरीब रुग्णांकडे हे गांभीर्याने लक्ष देतील.
- रिजवान शहा, तक्रारदार

 

वडाळागावातील प्रसूतीगृह सुरू करावे..
वडाळागावात महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले रुग्णालय सध्या शोभेचेच ठरले आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील रुग्ण डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे रुग्णालय सुरू झाल्यास प्रसूती येथे होईल व याचा फायदा वडाळासह इंदिरानगर भागातील नागरिकांना होणार.
- अॅड. श्याम बडोदे, नगरसेवक

 

वारंवार घडत आहेत अशा घटना, आयुक्तांचे दुर्लक्ष
काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या मायको दवाखान्याच्या दारासमोरच एका महिलेची रिक्षामध्ये प्रसूती झाल्याची घटना घडली होती. तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेबाबत हलगर्जीपणा दाखवत योग्यवेळी योग्य उपचार न झाल्याने मृत बालकाला जन्म देण्याची वेळ आली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बाळाच्या आईने व कुटुंबीयांनी थेट अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत बालक ठेवून आक्रोश केला होता. त्याचबरोबर इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या एका महिलेकडे तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची ही बाब समोर आल्यानंतर या महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला व तिच्या बाळाला बिटको रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. या महिलेकडे बिटको रुग्णालयातही दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रारी करण्यात आली होती.

 

बातम्या आणखी आहेत...