आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांच्या कुटुंबीयांची मदत राेखणाऱ्यांवर कारवाई करा, विखे पाटलांचे CMना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहिदांच्या कुटुंबांना २५ लाख मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे ‘दिव्य मराठी’तील वृत्तानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या प्रकरणातील विसंगतीकडे लक्ष वेधले. २५ लाखांच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची विनंतीही केली आहे.   या पत्रानुसार, देशासाठी बलिदान देेणाऱ्या शहिदांचा हा अपमान संतापजनक आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी वाढीव मदतीची घोषणा करूनही शहिदांच्या कुटुंबांपर्यंत तो निधी पोहोचत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्वरित हस्तक्षेप करावा आणि संबंधित वाढीव निधी आठही शहीद कुटुंबांपर्यंत पोहोचवावा. खरे तर शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खाशी खेळणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा त्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात पोहोचू न देणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.  

 
मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबांना देण्यात येणारी मदत ८.५० लाखांवरून २५ लाख केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी केली होती. त्यानंतर सैनिक कल्याण विभागाने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबतचा प्रस्ताव पाठवल्याचे आणि त्यात १ जानेवारीपासून या बदलाची अंमलबजावणी करण्याचे नमूद केल्याचे पुढे आले.

 

त्यामुळे २३ डिसेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले मेजर प्रफुल्ल मोहरकर आणि ३० डिसेंबरला अरुणा प्रदेेशात शहीद झालेले मेजर प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबांना या २५ लाखांचा लाभ मिळाला नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशात आणले. त्या वेळी सैनिक कल्याण संचालक सुहास जतकर यांनी  एक जानेवारीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे व आपण  फक्त त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव पाठवल्याचे स्पष्टीकरण ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले होते. प्रत्यक्षात २५ लाखांचा कोणताही निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे   २१ डिसेंबरची मुख्यमंत्र्यांची २५ लाखांची घोषणा चार महिन्यांनंतरही हवेतच असल्याचे सिद्ध झाले आहे.   

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, धुळ्याच्या शहीद भदाणेंच्या कुटुंबासही 8.50 लाखच...  

बातम्या आणखी आहेत...