आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढाईत अखेर कुत्राच ठरला शेर, बिबट्याच्या बछड्याची झाली मांजर; एक तासाच्या धुमश्चक्रीत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- चार महिने वयाच्या बिबट्याच्या नर बछडा शिकारीसाठी बाहेर पडला खरा, मात्र कुत्र्यांच्या तावडीत सापडून त्याची पळता भुई थोडी झाली. एक तासाच्या धुमचक्रीत डरकाळ्या फोडणाऱ्या चार महिने वयाच्या नर बछड्याची चांगलीच दमछाक झाली. तथापि, घाबरून गेलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला.  


नाशिक जिल्ह्यातील खंबाळे शिवारात निवृत्ती गोफणे यांच्या वस्तीजवळ बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. तीन कुत्र्यांनी बछड्याला घेरून त्याच्यावर वेळोवेळी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बछडा डरकाळ्या फोडून कुत्र्यांचे वार परतवून लावत होता. मात्र, तिन्ही कुत्र्यांना तोंड देताना बछड्याच्या चांगलेच नाकीनऊ आले. भुंकण्याच्या आवाजाच्या दिशेने गोफणे यांनी जवळ जाऊन पाहताच कुत्रे व बछड्यात सुरू असलेली धुमचक्री त्यांना दिली. काही वेळाने बिबट्या पळ काढून लपण्याची जागा शोधू लागला. मात्र, कुत्रे त्याला घेरू लागले. एका काटेरी झुडपात बिबट्याने आश्रय घेण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. अखेर गोफणे यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले.


बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न
वन विभागाला कळवल्यानंतर वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, प्रीतेश सरोदे, मारुती भुजबळ, शरद थोरात, पोपट बिन्नर, तुकाराम डावरे हजर झाले. तोपर्यंत बिबट्याच्या डरकाळ्याही कमी झाल्या होत्या. उठून चालण्याचा प्रयत्नही अपुरा ठरत होता. अखेर बिबट्याला सिन्नरच्या मोहदरी घाटात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी बिबट्याची तपासणी केली. तथापि, बिबट्याचा मृत्यू झाला होता.


कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर अति घाबरल्याने बिबट्याच्या फुप्फुसात अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे शवविच्छेदनावेळी निदर्शनास आले. अति घाबरून मृत्यू, अशी नोंद शवविच्छेदन अहवालात करण्यात आली आहे. मानेजवळ किरकोळ जखम झाली होती. परंतु, तीही कुत्र्यांच्या चाव्यामुळे झालेली नाही. अंगाला काही तरी घासल्याने ही जखम झालेली असावी, असाही निष्कर्ष डॉ. भणगे यांनी नोंदवला आहे. कमी वय असल्याने बछड्याला शिकारीची माहितीही कमी असावी, असाही अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...