आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या हटविल्या, ४ ट्रक साहित्य जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काही दिवसांपासून बंद असलेली अतिक्रमणविरोधी मोहीम महापालिकेच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ३) शहरातील मुंबईनाका, एम. जी. रोड, सीबीएस परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरविण्यात आला. यावेळी अवैध बांधकाम, दुकानालगतचे शेड, टपऱ्या असे चार ट्रक साहित्य जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या ठरावाद्वारे रस्त्याच्या कडेला थाटण्यात आलेल्या टपऱ्याही या माेहिमेत हटविण्यात अाल्या. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता. 


शहरातील अनधिकृत बांधकाम, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या वतीने मोहीम उघडण्यात आली. गुरुवारी सकाळी पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत मुंबईनाका परिसरातील एका हॉटेलसमाेरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेला शेड, तसेच बांधकाम यावेळी पाडण्यात आले. एमजी राेडवर दुकानासमाेरील कुलरही अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी उचलले. 


यानंतर मोहीम सीबीएस, मेहेर सिग्नल परिसरात राबविण्यात आली. यावेळी परिसरातील दुकानदारांनी दुकानांच्या बाहेर ठेवलेले बॅनर, जाहिरात फलकांसह इलेक्ट्रॉनिक कूलरही या मोहिमेत जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे स्थायीचे ठराव करून रस्त्याच्या कडेला थाटण्यात आलेल्या टपऱ्याही यावेळी हटविण्यात आलेे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच विनापरवाना केलेले बांधकाम, शेडविराेधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत पश्चिम विभागाचे १० कर्मचारी, एक जेसीबी, एक डंपर, एक ट्रॅक्टर आदी सहभागी झाले होते. 


हॉकर्स झोनमध्ये जाण्यास विक्रेत्यांचा नकार 
महापालिकेच्या वतीने सहाही विभागांत फेरीवाला झोन विकसित करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी व्यवसाय करण्यास योग्य जागा वा अडचणी असल्याने या ठिकाणी जाण्यास फेरीवाल्यांकडून नकार दिला जात आहे. परिणामी विक्रेत्यांकडून शहरातील मध्यवर्ती भागात व्यवस्था करण्यात येत असल्याने अतिक्रमणात अधिकच भर पडत आहे. 

बातम्या आणखी आहेत...