आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरपाडा बोगद्याच्या १८० फूट खोल शाफ्टमध्ये उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मांजरपाडा पाणीपुरवठा वळण योजनेतंर्गत दिंडोरीतील सारसाळे गावापासून १५० मीटर अंतरावर बोगद्याचे खोदकाम सुरु असून येथील १० मीटर रुंद आणि ५६ मीटर म्हणजे तब्बल १८० फूट खोलीच्या शाफ्टमध्ये उडी घेत शंकर मंगा गायकवाड या शेतकऱ्याने गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह काढण्याचे काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, मनपा अग्निशमन अधिकारी आणि स्थानिक महसूल प्रशासनाच्या वतीने रात्री उशीरापर्यंत सुरु होते. 


दिंडोरी तालुक्यातून मांजरपाडा वळण योजनेच्या बोगद्याचे खोदकाम सुरु आहे. त्यामुळे गावातील घरांना, बांधकामांना तडे गेल्याच्या काही तक्रारी आल्या. त्याचबरोबर विहिर किंवा इतर मालमत्तांचेही नुकसान झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याची उपविभागीय अधिकाऱ्यांनी तपासणीही केली. पण त्यात तसे आढळून येत नसल्याचा अहवाल त्यांनी दिल्याचे लेखी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे अधीक्षक अभियंत्यांनाही कळविले. त्याची एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यात म्हटल्यानुसार शंकर गायकवाड यांनी खोदकामापासून २५० मीटर अंतरावरील विहिरीच्या नुकसानीची मागणी केली होती. तलाठी सारसाळे यांच्या पंचनाम्यानुसार ३० हजार मंजूर करण्यात आले. त्यास गायकवाड यांनी संमती दिली. त्यानंतर कंत्राटदार कंपनीचे बंद पडलेले काम मार्च २०१७ मध्ये सुरु झाल्यानंतर गायकवाड यांनी पुन्हा प्रातांकडे अर्ज केला. त्यावर कंत्राटदार कंपनी केसीएलटी- टीआयपीएल (जेव्ही) यांच्याद्वारे संबधित शेतकऱ्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. 


१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरही लिहून घेण्यात आले. पण त्यानंतरही गायकवाड यांच्याकडून वाढीव मोबदल्याची मागणी सुरुच होती. वारंवार काम बंद पाडण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जून २०१८ मध्ये गायकवाड यांनी बोगद्याच्या कामासाठीच्या जनरेटरची थ्री- फेज वायर कुरतडल्याने जवळील ६ ते ७ एकर शेतात आगही लागल्याने नुकसान झाली होती. त्याविरोधात वणी पोलिसांत तक्रारही दाखल कऱण्यात आली होती. 


अशातच गुरुवारी (ता.१९) शंकर गायकवाड यांनी १८० फूट खोल शाफ्टमध्येच उडी घेऊन आत्महत्या केल्याने आता प्रशासनासमोरील अडचणीही वाढल्या आहेत. तर त्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठीही लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. 


५३ वी शेतकरी आत्महत्या 
ही शेतकरी आत्महत्या गृहित धरण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्महत्यांची संख्या वाढून ती ५३ झाली आहे. स्थानिक चौकशी केल्यानंतर जिल्हास्तरावर संबधित शेतकरी गायकवाड यांच्या कुटुंबियांना मदतीसाठीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...