आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला अाले १२६ प्रवासी, दिल्लीस पाेहाेचले १२५ प्रवासी; जेट एअरवेजच्या सेवेचा पहिला दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जेट एअरवेजकडून नाशिक-दिल्ली विमानसेवेला शुक्रवारी सुरुवात झाली. दिल्लीहून १२६ प्रवाशांना घेऊन दुपारी २.१४ वाजता जेटचे अद्ययावत १६८ आसनी बोइंग ७३७ विमान नाशिक विमानतळावर दाखल झाले. दुपारी ३.१८ वाजता १२५ प्रवाशांना घेऊन नाशिक विमानतळावरून ते दिल्लीकडे रवाना झाले. विशेेष म्हणजे या विमानाला कार्गाेची सेवा उपलब्ध झाल्याने नाशिकहून तीन टन केशर अांबे लंडनसाठी तर एक टन ताजा भाजीपाला दुबर्इसाठी पाठविला गेला. यामुळे जेटच्या या सेवेमुळे केवळ नाशिककरांना देश-विदेशात प्रवासच नाही तर येथील भाजीपाला, फळे, फुले यांच्याकरिता जागतिक बाजारपेठ काही तासांवर अाली अाहे. 


केंद्र सरकारच्या उडान याेजनेंतर्गत नाशिक-दिल्ली या शहरांना जाेडणारी थेट विमानसेवा सुरू झाल्याचे स्वागत प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे केल्याचे पहिल्या दिवशी दाेन्ही बाजूने मिळालेल्या प्रवाशांच्या प्रतिसादातूनच स्पष्ट झाले अाहे. अाेझर विमानतळ या सेवेच्या शुभारंभाकरिता सज्ज हाेते. 


तीर्थ चाैरासिया ठरला पहिला प्रवासी 
नाशिकचाच रहिवासी असलेला तीर्थ चाैरासिया हा मुलगा नाशिक-दिल्ली विमानसेवेचा पहिला प्रवासी ठरला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला बाेर्डिंग पास प्रदान करण्यात अाला. त्याचे अाई अाणि वडीलही त्याचे सहप्रवासी हाेते. नाशिकहून ही सेवा झाल्याने अमूल्य वेळ अाणि मुंबईहून जाण्याचा खर्चही वाचल्याचा अानंद अनेकांनी यावेळी व्यक्त केला. सेवेच्या पहिल्याच दिवशी विमानाने पंधरा मिनिटे उशिराने दिल्लीकडे उड्डाण घेतले. 


भाजी-फळे निर्यातीचा मार्ग खुला 
प्रीमिअर व इकॉनॉमी या दोन्ही वर्गांना आरामदायी सुविधा या सेवेतून उपलब्ध करून देण्यात अाल्या अाहेत. प्रथमच बी-७३७, १६८ आसनी विमानामुळे नाशिक व नवी दिल्ली यादरम्यान कार्गो क्षमताही वाढेल आणि प्रति विमान २५०० किलो म्हणजे दर आठवड्याला ७५०० किलो मालवाहतूकही शक्य झाली अाहे. यामुळे निर्यातदारांना आता दिल्लीमार्गे माल पाठवण्याची सुविधा मिळाली अाहे. फळे व भाज्या, मश्रूम, ऑटोमोटिव्ह स्पेअर्स, इंजिनिअरिंग गुड्स, मशिनचे लहान भाग व फार्मास्युटिकल्स अशा कमोडिटींचा समावेश आहे. 


अाठवड्यातील तीन दिवस सेवा 
- नाशिककरांना अाठवड्यातील साेमवार, बुधवार अाणि शुक्रवार असे तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. 
- नवी दिल्ली येथून दुपारी १२ वाजता उड्डाण हाेईल, ते नाशिकला दुपारी २.०५ ला पाेहाेचेल. 
- नाशिकहून दुपारी २.३५ वाजता उड्डाण हाेईल. ते दुपारी ४.२५ ला दिल्लीला पाेहाेचेल. 
- १६८ पैकी ४० अासने उडान याेजनेंतर्गत प्रवाशांना उपलब्ध असतील. 
- १२ बिझनेस क्लासची तर १५० इकाॅनाॅमी क्लासची अासने असतील. 
- उडान याेजनेंतर्गत कमीतकमी २८९० रुपये भाडे अाहे. 
- उदयोन्मुख शहरांशी जाेडणारी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी नाशिकककरांना मिळणार अाहे. 


मुंबईला पर्याय म्हणून नाशिक विमानतळाचा विचार 
उडान याेजनेंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करणे हा अामच्यासाठी अभिमानाचा क्षण असून, या सेवेद्वारे जेट एअरवेजच्या देशांतर्गत व अांतरराष्ट्रीय नेटवर्कद्वारे विविध शहरांमध्ये नाशिककरांना प्रवास करता येणार अाहे. येथील विमानतळ, धावपट्टी, सुविधा अत्यंत चांगल्या असून, येथील विमानसेवेकरिताचा प्रतिसाद, लाेकांची मागणी याचा अभ्यास करून लवकरच मुंबर्इ विमानतळाला पर्याय म्हणून नाशिक विमानतळाचा विचार अाम्ही करू, तसेच प्रतिसाद चांगला मिळाल्यास दरराेज सेवा देणार असल्याचे जेट एअरवेजच्या नेटवर्क प्लॅनिंग व रेव्हेन्यू मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुुमार यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...