आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या व्यावसायिकास ब्रिटिश कंपनीच्या नावाखाली 41 लाखांचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इलेक्ट्रिकल व्यावसायिकाच्या इंडिया मार्ट साइटवर संपर्क साधत केन्ट फार्मास्युटिकल्स या ब्रिटनमधील कंपनीच्या महिला डॉक्टरने अनप्रोसेस्ड नॅस्ट्रोजन सीडची मागणी करत या बिया दिल्लीमध्ये उपलब्ध असल्याचे सांगत तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि. २) सायबर पोलिस ठाण्यात महिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रदीप मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माेरे यांचा इलेक्ट्रिक व्यवसाय आहे. त्याशी निगडित इंडिया मार्ट या साइटवर रजिस्ट्रेशन केले आहे. डॉ. ख्रिस्ती ज्युन्स या महिलेने मोबाइल नंबरवर संपर्क साधत केन्ट फार्मास्युटिकल्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत अनप्रोसेस्ड नॅस्ट्रोजन सीड या बियांची मागणी केली. या बियांबाबत माहिती नसल्याचे सांगितले असता त्या डॉक्टर महिलेने 'मी तुम्हाला अॅरेंज करून देते', असे सांगत प्रियंका शर्मा या महिलेचा मोबाइल नंबर दिला. मोरे यांनी महिलेशी संपर्क साधला असता ग्लोबल इंटरप्रायजेस, दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला सुरुवातीला बियांचे एक सॅम्पल पॅकेट घ्यावे लागेल. त्यासाठी एक लाख २८ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेच्या दिल्ली शाखेत भरावे लागतील असे सांगितले. 


सप्टेंबर २०१७ मध्ये मोरे यांनी आयसीआयसीआय बँकेच्या पिंपळगाव बसवंत शाखेत या रकमेचा भरणा केला. २२ सप्टेंबर राेजी एक लाख २६ हजार रुपये कोटक महिंद्रा बँकेतून आरटीजीएस करून दिल्ली शाखेत जमा केले. यानंतर डॉ. ख्रिस्तीने फोन करून कंपनीचा पर्चेस मॅनेजर मॉरिस मूर यास गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले. त्याला बायहॅण्ड पर्चेस ऑर्डर दिली. यानंतर परत ग्लोबल एंटरप्रायजेसमधून २० पॅकेट घेण्यासाठी अॅडव्हान्स सहा लाख, पाच लाख ३४ हजार, चार लाख ८२ हजार, चार लाख असे ग्लोबलच्या बंधन बँक आणि इंडियन अाेव्हरसीज बँकेच्या दिल्ली शाखेतील खात्यात जमा केले. यानंतर अॅन्थनी चान्डलर नामक व्यक्तीने ओव्हरसीज सर्व्हिस बँकेतून फोन करत पाैंडमध्ये भारतीय चलन बदलण्यासाठी युनिव्हर्सल एंटरप्रायजेसच्या आयसीआयसीआय बँकेच्या राजुरी (दिल्ली) येथील खात्यात सहा लाख ९९ हजार रुपये जमा केले. 


यानंतर क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अाठ लाख ९५ हजार रुपये वरील खात्यात जमा केले. तसेच तीन लाख रुपयांची रक्कम अारटीजीएसद्वारे जमा केली. १६ डिसेंबरपर्यंत सर्व संपर्कात होते. मात्र, यानंतर फोन बंद झाले. मात्र, परदेशातून इ-मेलद्वारे संपर्कात आहेत. वारंवार पैशांच्या मागणीमुळे संशय आल्याने मोरेंनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. 


फेक कॉलला प्रतिसाद देणे टाळा 
मोबाइलवर अनोळखी नंबरवरून बक्षीस लागल्याचे, वस्तू खरेदीचे तसेच लॉटरी लागल्याचे अामिष दाखवत असल्यास सतर्क व्हा. अशा कॉलद्वारे फसवणूकच होते. अशा प्रकारे कुणी कॉल करून बँकेत पैसे भरण्यास प्रवृत्त करत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. 
- राजेंद्र कुटे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 

बातम्या आणखी आहेत...