आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, भाजप नेत्यांनी केले बापूंच्या ‘उपवासा’ला भ्रष्ट, तुषार गांधी यांची प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे फसलेले उपोषण, छाेले-भटुरेंमुळे उपहासाचा विषय बनलेला काँग्रेस नेत्यांचा उपवास अाणि अाता पंतप्रधान नरेंद माेदींसह भाजप खासदारांचे उपाेषण... या सर्वांनी महात्मा गांधीजींच्या ‘उपवास’ या सत्याग्रहाची विटंबना केली अाहे, अशी प्रतिक्रिया गांधीवादाचे अभ्यासक व महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.  

 

प्रश्न : अण्णा, काँग्रेसनंतर अाता मोदी उपवास करत आहेत. गांधीवादी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही याकडे कसे पाहता?  
गांधी : ‘उपवास’हे  सत्याग्रहाचे अत्यंत प्रभावी शस्त्र बापूंनी जगाला दिले. त्यांनी हे शस्त्र आत्मशुद्धीसाठी किंवा लोकांच्या मतपरिवर्तनासाठी वापरले. आजच्यासारखे ब्लॅकमेलिंगसाठी नाही. परंंतु, आज त्यांच्याच देशात सध्याच्या राजकर्त्यांनी त्याचा मजाक बनवला आहे. हे अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे.


प्रश्न : गांधीजींना उपवासाचा काय अर्थ अभिप्रेत होता?  
गांधी : बापू दोन प्रकारचे उपवास करत असत. एक आत्मशुद्धीसाठी आणि दुसरा लोकांच्या मतपरिवर्तनासाठी. पहिल्या प्रकारचे उपवास स्वत:साठी असत. बहुसंख्य वेळा ते पश्चात्ताप स्वरूपाचे असत. त्यासाठी ते निश्चित स्वरूपाचा कालावधी जाहीर करीत. कोणत्या स्वरूपाचे ते उपवास असत हेदेखील जाहीर करीत. म्हणजे लिंबू-पाणी पिऊन करणार की फक्त पाणी पिऊन करणार इत्यादी. त्यात स्वत:ची शुद्धी, स्वत:चे प्रायश्चित्त महत्त्वाचे होते. केव्हा सुरू करणार, केव्हा सोडणार याचे ठोस नियोजन असे. आज कुणाही कधीही सोयीप्रमाणे उपवास जाहीर करतात, ब्रेकफास्ट ते लंच किंवा लंच ते टी असे त्यांच्या सोयीने उपवास करतात याला उपवास म्हणतच नाहीत.


प्रश्न : आणि उपवासाचा दुसरा प्रकार काय हाेता?  
गांधी : दुसऱ्या प्रकारचे उपवास हे राजकीय स्वरूपाचे असत. मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाल्यावर अंतिम साधन म्हणून बापू उपोषणाचा आधार घेत. आज उपवासाचा फक्त देेखावा केला जाताे. उपवासाचा अर्थ त्यांना माहीतच नाही. असला तरी ते उपवासाचे शस्त्र आंदोलनाचा प्रयोग म्हणून अजिबात करत नाहीत, तर ढोंग म्हणून, देखावा म्हणूनच उपवास वापरत आहेत. काँग्रेसपासून माेदींपर्यंत सगळ्यांनी ‘उपवासा’च्या तंत्राला भ्रष्ट केले आहे. त्याचा फार्स केला आहे.


प्रश्न : म्हणजे नेमके काय?  
गांंधी : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करत आहेत. कारण काय तर विरोधी पक्षांनी लोकसभेत कामकाज होऊ दिले नाही. मग त्यांनी त्यावर काय केले? पुढील सत्रे होऊ दिली नाहीत तर ते राजीनामा देणार का? अधिवेशनात चर्चा होऊ न देणे हे त्यांच्याच इशाऱ्यावर चालत होते. कामकाज होऊ नये याचे सूत्रधार तेच आहेत. मग आता ते उपवास करून कसले ढोंग करत आहेत? ही तर लोकांची फसवणूक आहे. पंतप्रधानांना उपवास करायचा असेल, पश्चात्ताप करायचा असेल तर इतरही अनेक विषय आहेत. देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, विघटनकारी शक्ती वाढत आहेत, गरिबांचे शोषण वाढत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. या विषयांसाठी पंतप्रधानांनी कधी उपवास केला नाही. त्यांचे नेते किती अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकार करत आहेत. त्याबद्दल त्यांनी उपवास करण्याची गरज आहे.


प्रश्न : आणि काँग्रेसचा उपवास?  
गांधी : ते ही ढोंगच होते. राजघाटावर ५ तास बसले की उपवास झाला, हा इव्हेंटच बापूच्या ‘उपवासा’ला हडताळ फासणारा आहे. बापू कोणत्याही विषयावर उपवास करायचे तेव्हा तो विषय लोकांपर्यंत पोहोचावा, त्याची लोकांमध्ये चर्चा व्हावी, हा उद्देश असे. काँग्रेसच्या उपवासाची चर्चा वेगळ्याच कारणांसाठी झाली. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही उपवासाचा फार्स केला आहे.


प्रश्न : बापूंच्या फिलॉसॉफीत ‘उपवासा’ची भूमिका आणि महत्त्व नेमके काय आहे?  
गांधी : बापूजींसाठी उपवास हे अत्यंत शक्तिशाली शस्त्र होते. प्रश्न सुटेपर्यंत तो उपवास चाले.  ज्या मागण्यांसाठी उपवास केला जाई त्या अटी-शर्ती आधीच जाहीर केल्या जात. त्याच्या पूर्ततेसाठी कालावधी दिला जाई. ते सर्व मार्ग बंद झाल्यावर उपवासाचे शस्त्र बाहेर काढले जाई. त्यातही अटी-शर्ती आणि मागण्या हा महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा बनत असे. गांधींचा उपवास सुरू झाला की त्यांचे कार्यकर्ते त्याबद्दल लोकांमध्ये जाऊन संवाद साधत, लोकांची जनजागृती करीत. आज ते काहीच होत नाही. फक्त काही तासांसाठी राजघाटावर जाऊन बसणं म्हणजे गांधी मार्ग अनुसरणे नाही.
 

बातम्या आणखी आहेत...