आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ३ दिवसांपासून पावसाचा जोर; गंगापूर ७८.५४ टक्के भरले, ९ हजार ३०२ क्युसेकने विसर्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- तीन दिवसांपासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान जिल्ह्यात २७० मिमी तर इगतपुरीत ५५, त्र्यंबकेश्वरमध्ये ३९ मिमी पावसाची नोंद झाल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. गंगापूर धरण ७८.५४ टक्के भरले. त्यामुळे रात्री ८ वाजता गंगापूरमधून ९ हजार ३०२ क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला. 


दारणातूनही १० हजार ६०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. गतवर्षीपेक्षा गंगापूर धरणात साडेतीन तर समुहात १३ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा पावसाचे जिल्ह्यात विलंबाने आगमन झाले असले तरीही सध्या नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे डोंगरांवरुन वेगाने कोसळणाऱ्या पाण्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोळी, धोंडबारी घाट (ओझरखेड), वाघेरा घाट या तीन ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 


जूनच्या पहिल्याच आठवड्यात आगमन झाल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार पुनरागमन केले. गत आठवड्यात काहीसा दिलासा दिल्यानंतर मागील तीन दिवसांत पावसाने नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि निफाडमध्ये जोरदार धडक दिली. परिणामी शहर आणि जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेल्या गंगापूर आणि दारणा हे दोन्ही धरण समूह ७५ टक्के भरली. पुढील तीन दिवस मुळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धरणातून वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


सुरगाणा: सर्वाधिक ६१ मिमी पाऊस 
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असला तरीही नेहमीप्रमाणेच जिल्ह्यातील पूर्व भागातील तालुक्यांसह ८ तालुक्यांत ७ मिमी पेक्षा कमी पाऊस पडला. सोमवारी सकाळी ८ ते ५ या दरम्यान सुरगाण्यात सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल पेठमध्ये ५९, इगतपुरीत ५५, त्र्यंबकेश्वरमध्ये ३९, नाशिक २२, सिन्नर १७ मिमी पावसाची नोंद झाली. बागलाण, नांदगाव, मालेगाव, चांदवड ही चार तालुके पूर्ण कोरडीठाक होती. देवळ्यात १ मिमी, दिंडोरीत २, निफाड ४.५, कळवण ३, येवल्यात ७ मिमी असा जिल्ह्यात २७० मिमी पाऊस पडला. 


अवघा महाराष्ट्र चिंब 
अखेर पावसाने अवघा महाराष्ट्र चिंब करून टाकला. रविवार, सोमवारी राज्यभरात सर्वदूर पाऊस बरसला. मराठवाडा, मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी पावसाने झड लावली. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले. धरणांच्या जलसाठ्यातही वाढ नोंदवण्यात आली आहे. काही धरणांतून विसर्गही सुरू झाला आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. 

बातम्या आणखी आहेत...