आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीच्या लेकींनी यंदा जिंकली बाजी, मुलींच्या निकालात ५.१२ टक्क्यांनी वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.१६ टक्के एवढी असून, त्या तुलनेत मुलींचा निकाल ९०.२८ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत शहरातील बहुतांश शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश मिळवले आहे. 


महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभाग राज्यात सहाव्या स्थानावर आहे. दहावीत एकूण ५६ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 


विद्यार्थ्यांना लवकरच शाळेतून गुणपत्रक देण्यात येणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी संकेतस्थळावर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला अाहे. ज्या विद्यार्थ्यांना अापल्या मिळालेल्या गुणांबाबत काही शंका असेल त्यांच्या गुण पडताळणीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरील स्वसाक्षांकित प्रतीसह शनिवार (दि. ९) ते सोमवार (दि. १८) पर्यंत विहित शुल्क करून अर्ज करता येईल. छायाप्रतींसाठी २८ जूनपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै २०१८ व मार्च २०१९ मध्ये परीक्षेस प्रविष्ट होता येईल. १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा होणार असून अधिकृत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. 


१३२ कॉपीबहाद्दरांवर कारवाई 
'गैरमार्गाशी लढा' या अभियानांतर्गत दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार कमी करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जातात. मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहता गैरमार्गाचे प्रमाण घटत असले तरी पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होत नाही. मार्च २०१२ मध्ये विभागात ४७१, मार्च २०१३ मध्ये ३०१, मार्च २०१४ मध्ये १४६, मार्च २०१५ मध्ये १३२ तर २०१६ मध्ये २४१, २०१७ मध्ये १९३ गैरमार्ग प्रकरणे मिळाली होती. यंदा ४५ भरारी पथकांच्या माध्यमातून १३२ गैरमार्गाची प्रकरणे निदर्शनास आली असून, त्यातील ८७ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली. यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव उपस्थित होते. 


दहावीच्या परीक्षेत राज्यातील २१ हजार ९५७ पैकी ४ हजार २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहेत. नाशिक विभागातील २ हजार ६६९ शाळांपैकी ३६८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ९० ते ९९ टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या ९७३ एवढी आहे. 

बातम्या आणखी आहेत...