आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाने माल निर्यातीसाठी शेतकरी कंपन्यांना अनुदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्रातील विविध भागांतून फळे आणि  भाजीपाला देशाच्या ईशान्य पूर्वेकडील राज्यांना मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. यामध्ये आंबा, द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाला असून हा नाशवंत आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी रस्त्याने आणि रेल्वेने उशीर होत असल्याने नुकसान होते. शेतीमाल ताजा आणि स्वच्छ माल जाण्यासाठी विमानाने वाहतूक परवडत नाही. त्यामुळे पणन महामंडळाच्या वतीने विमानाद्वारे शेतीमाल पाठवण्यासाठी शेतकरी कंपन्यांना ५० टक्के अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.    


राज्यामध्ये आंबा, द्राक्षे, डाळिंबासह भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. राज्यातील शेतीमाल विक्रीसाठी आंतरराज्य व्यापार वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य दर त्वरित मिळण्यासाठी पणन महामंडळाने जून महिन्याच्या प्रारंभापासून शेतकरी कंपन्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी विमानाने (फक्त कार्गो) वाहतूक सेवा सुुरू केली आहे. यामध्ये शेतकरी कंपन्यांना प्रतिकिलो वजनाच्या हवाई खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. परंतु ही योजना फक्त  मिझोराम, आसाम, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यांसाठी असून ती फक्त सहा महिन्यांसाठी आहे. ज्या शेतकरी कंपन्यांना शेतीमाल पाठवायचा आहे, त्यांना यासाठी पणन महामंडळाची लेखी मंजुरी घेणे बंधनकारक आहे. एकाच वेळी २२ मेट्रिक टन शेतमाल कार्गो विमानामार्फत पाठवण्यात येणार आहे. 

 

कमाल ५० लाखांपर्यंत मिळणार अनुदान    
पणन महामंडळाच्या या योजनेमध्ये एका शेतकरी उत्पादन कंपनीला सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंत कमाल ५० लाख  किंवा तीन वेळा जाणे व येणे अशा कमाल सहा उड्डाण फेऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.   

 

वाहतूक खर्चाचे प्रस्ताव १५ दिवसांत सादर करा  
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या योजनेअंतर्गत संबंधित राज्यांना व्यापार केलेल्या विमान वाहतूक खर्चाचे प्रस्ताव प्रत्यक्ष शिपमेंटनंतर १५ दिवसांच्या कालावधीत कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे. १५ दिवसांनंतर विलंबाने प्राप्त झालेले प्रस्ताव अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.   
दिग्विजय आहेर, उपसरव्यवस्थापक, पणन महामंडळ 

 

 

बातम्या आणखी आहेत...