आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड, चांदवडला वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपले; उन्हाळ कांद्यासह गव्हाला फटका, शेतकऱ्याची धावाधाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोरदार वाऱ्यामुळे मनमाडला कांद्यांचे शेड कोसळून असे नुकसान झाले. - Divya Marathi
जोरदार वाऱ्यामुळे मनमाडला कांद्यांचे शेड कोसळून असे नुकसान झाले.

नाशिकरोड / चांदवड / मनमाड- जिल्ह्यातील चांदवड, मनमाड, दुगाव, सुतारखेडे परिसरात शनिवारी जोरदार वारा आणि गारांसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. चांदवड शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात अचानक आलेल्या पावसात हरभऱ्याच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे द्राक्षबाग, गहू, उन्हाळ कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. मनमाडमध्ये पाऊस व त्यानंतर बेफाम सुटलेल्या वादळाने एकच दाणादाण उडून आर्थिक नुकसान झाले. यात एकजण जखमी झाला. चांदवड व मालेगावरोड अशा दोन ठिकाणी तीन व्यापाऱ्यांचे कांद्याचे पाच शेड कोसळून त्यातील ८०० क्विंटल कांदा शेडखाली दाबला गेल्याने लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने मनमाडमध्ये वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. दरम्यान, अजून दोन दिवस बेमोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 


पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकसह राज्यातील मराठवाडा, विदर्भामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तसेच देशाच्या पूर्व भागाकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात बेमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातही शुक्रवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी दुपारनंतर मनमाड, चांदवड, सुतारखेडे, कुंदलगाव, दुगाव, हरसूल परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. यावेळी बोराच्या आकाराच्या गाराही पडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या कांदा काढणीचे काम सुरू असून बहुतांश कांदा शेतामध्येच असल्याने तो प्लास्टिकच्या कागदाखाली झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. 


चांदवडला तारांबळ....
चांदवड शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातील डोणगाव, निमोण, वाद-वराडी, दरेगाव, शिंगवे, दहेगाव, कुंदलगाव परिसराला पावसाने झोडपून काढले. गेल्या काही दिवसांपासून तपमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, शनिवारी दुपारी दाेन वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रारंभी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटात पावसाचा जोर वाढला. त्यातच सुमारे १० ते १५ मिनिटे हरभऱ्याच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याने काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतात उघड्यावरील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पाऊस व वाऱ्यामुळे तपमानात काही प्रमाणात घट होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे शेतात काढून पडलेल्या कांद्याचे, कापलेल्या गव्हाचे नुकसान झाले. द्राक्षबागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. 


मनमाडमध्ये वादळी पावसामुळे नुकसान
मनमाडमध्ये पावसामुळे मालेगाव राज्यमार्गावर विनोद संकलेचा व सानप यांचे प्रत्येकी एक तसेच चोपडा यांचे कांद्याचे शेड कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात फलाट क्रमांक तीन व चारवर जुन्या झाडाची मोठी फांदी तुटून ती हुज्जू शेख (२३) च्या अंगावर पडल्याने तो जखमी झाला. 

 


सुदैवाने रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे ही फांदी कोसळली, अन्यथा रेल्वे वाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता होती. तसेच शहराच्या अनेक भागात तुफानी वादळाने झाडे व फांद्या कोसळल्या. त्या अनेक ठिकाणी वीजतारांवर पडल्या. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला. शनिवारी सकाळपासूनच उकाड्याने तसेच तपमान ४० अंशांवर गेल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. दुपारी तीननंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर ऊन पडले पण पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या तुफानी सोसाट्याच्या वादळाने एकच दाणादाण उडवून दिली. वादळाचा वेग इतका भीषण होता की क्षणार्धात धुळीचे लोट उसळले. सर्वच वाहतूक ठप्प होऊन सर्व वाहने जिथल्या तेथेच थांबली तर पादचाऱ्यांनी पळापळ करीत आडोशांचा आधार घेतला. 


दोन दिवस उकाडा राहण्याचा अंदाज 
ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असून उकाडा कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणात दोन दिवस उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...