आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संदर्भ'मधील आरोग्य सुविधा 'जीवनदायी'मध्ये, विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार माेफत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वैद्यकीय निदान व उपचाराच्या खर्चात मोठी वाढ झाली असल्याने शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत मिळणारा वैद्यकीय खर्चही अपुरा पडत आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमधील अधिकचा खर्च रुग्णांना स्वत: भरावा लागत आहे. दुसरीकडे, जीवनदायी याेजनेंतर्गत केवळ शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना असल्याचे कारण देत शासकीय रुग्णालयांकडून तपासण्यांचा खर्चही रुग्णांकडूनच वसूल केला जात होता. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश काेशिरे यांनी दखल घेत महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत येणारे तपासण्याही मोफत केल्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा आता गोरगरीब रुग्णांना होत आहे.

 

महात्मा फुले (राजीव गांधी) जीवनदायी आरोग्य योजनेत शहरातील काही खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांचाही समावेश आहे. मोठ्या रुग्णालयांना 'सी' दर्जा असल्याने रुग्णांना अपुरा उपचार खर्च मिळत आहे. गरीब रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी जीवनदायी योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आरोग्य विम्यांतर्गत वर्षभरात दीड लाख रुपये उपचार खर्च दिला जात आहे. यापूर्वीच्या जीवनदायी आरोग्य योजनेत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाच्या आजारासह काही निवडक आजारांवर उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळत होती. राजीव गांधी जीवनदायी योजनेत ९७२ गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रियेसाठी एका कुटुंबाला वार्षिक दीड लाख रुपये व मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेत रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया, भोजन, औषधे, परतीच्या प्रवास खर्चाचा समावेश आहे. मात्र, या योजनेंतर्गत केवळ मोठ्या शस्त्रक्रियाच केल्या जात असून, यात तपासण्या करण्यास रुग्णालयांकडून नकार दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होते. शालिमार भागातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातही गेल्या काही महिन्यांपासून जीवनदायी याेजने अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या तपासण्या केल्या जात नसून, या सर्व तपासण्यांसाठी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील तक्रारींबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांनी दखल घेत रुग्णालयात येणारे केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र काैतुक केले जात अाहे. शेकडो रुग्णांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

 

गरीब रुग्णांना फायदा
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील अनेक गोरगरीब रुग्णांकडे साधा केसपेपर काढण्यासाठीही पैसे नसतात. त्यात त्यांना तपासण्यांचेही शुल्कही रुग्णालयांकडून घेतले जात होते. यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत होते. या तपासण्या आता रुग्णालयात जीवनदायी योजनेत होणार असल्याने गरीब रुग्णांचा फायदा होणार आहे.

 

रुग्णालय गोरगरिबांना सुविधा पुरविण्यासाठीच..
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण हे अतिशय गरीब असतात. अनेकवेळा त्यांच्याकडे केसपेपर काढण्यासाठीही पैसे नसतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून तपासण्यांचे पैसे घेणे योग्य नाही. त्यामुळे आता पुन्हा जीवनदायी योजनेत केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. - डॉ. राजेश कोशिरे, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ रुग्णालय.

 

बातम्या आणखी आहेत...