आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सटाणा, देवळ्याला 'अवकाळी'ने झोडपले; कांद्याचे मोठे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा / देवळा / ठेंगोडा - जिल्ह्यातील सटाणा व देवळा तालुक्याला गुुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून टाकले. काही ठिकाणी गारपीटही झाली. सध्या उन्हाळ कांदा काढणीचे व चाळीत भरण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याने अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ 2उडाली. गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमॅटो आदी पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडीवरही अवकाळी पावसाचा विपरित परिणाम होणार आहे.

 

देवळा परिसरात व तालुक्यातील कांचणे, कनकापूर व शेरी परिसरात गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भऊर, सावकी, विठेवाडी, खामखेडा परिसरात दुपारी चार-साडेचारच्या दरम्यान अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी कांदा ओला झाला तर काही ठिकाणी वीटभट्टीवर तयार केलेल्या विटा भिजल्या. काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. गेल्या आठ दिवसांपासून तपमानात वाढ झाली होती. तसेच रोज अचानक ढगाळ वातावरणही तयार होत होते. सध्या परिसरात रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची काढणी सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक कागद व ताडपत्र्यांची जमवाजमव करावी लागली. जो कांदा काढणीसाठी तयार होता त्याचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. परिसरात कांदा काढण्यासाठी मजूर टंचाईमुळे आधीच हैराण असलेला बळीराजा अचानक आलेल्या संकटामुळे हतबल झाला आहे.

 

बागलाण तालुक्यातील मोसम व पश्चिम पट्ट्यातील नांदीन, दरेगाव, कंधाणे, विंचुरे, वटार, जायखेडा, ब्राह्मणपाडे, निरपूर, नवेगाव, तिळवण, सोमपूर, खमताणे, औंदाणे, तरसाळी, वनोली, विरगाव, कपालेश्वर, जोरण, किकवारी, केरसाणे, दसाणे, पिंगळवाडे, मुंगसे, करंजाडसह काही गावांमध्ये वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. जायखेडा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने जायखेडा-सोमपूर -ताहाराबाद या राज्यमार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र प्रचंड उष्मा जाणवत असल्याने गुरुवारी दुपारनंतर बागलाण तालुक्यात बेमोसमी पावसाने थैमान घातले. काढणीनंतर शेतातील उन्हाळी कांदा उघड्यावर सापडल्याने कांदा उत्पादकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. तर गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमॅटो आदी पिके बेमोसमी पावसाने बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. दिवसभर ढगाळ हवामान, काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी सावली यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जात होती. अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा काढून चाळीत साठवण्यापूर्वी शेतातच ढीग मारून ठेवला होता. मात्र, दुपारनंतर आलेल्या अवकाळी पावसात हा कांदा भिजला. पावसाने ओला झालेला कांदा आता विक्री व साठवण्यायोग्य राहिलेला नाही. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडी या पिकांवरही अवकाळी पावसाचा विपरित परिणाम होणार आहे.

 

ठेंगोडासह लोहोणेर व आराई परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेदरम्यान अचानक वादळ वाऱ्यासह आलेल्या बेमोसमी पावसामुळे उघड्यावर कांदा काढून ठेवलेल्या शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी तारांबळ उडाली. तसेच कांदा काढत असलेल्या शेतकऱ्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

 

ठेंगोडा परिसरात पावसामुळे चाळीत भरण्याच्या आधीच कांदा भिजला
नाशकात पाऊस, वीज खंडित : नाशिकमध्ये सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागांत गारा पडल्या. पाच तास वीज खंडित झाली होती. फावडे लेनमधील एक वाडाही पडला. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता.

 

बातम्या आणखी आहेत...