आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशिदीत बसून हिंदूंनी जाणून घेतली इस्लाम धर्माची शिकवण, कट्टरवाद्यांना उपक्रमातून चपराक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - धर्मांविषयी पसरवले जाणारे गैरसमज जातीय तणावास प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. गैरसमज संपले तर तणावही संपुष्टात येईल. इस्लाम धर्माबद्दलचे गैरसमज दूर व्हावे या हेतूने जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेने हिंदू बांधवांना मशिदीत अामंत्रित करून मशिद परिचयाच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे अाचरण, शिकवण याची माहिती दिली.

 

गणेशाेत्सव काळात गणपतीची अारती केली म्हणून काही मुस्लिम तरुणांना इस्लाममधून बहिष्कृत केल्याचे फतवे जारी झाले हाेते. मात्र, मशिदीत एक येत फक्त मानवतेला प्राधान्य देणाऱ्या सुजाण हिंदू व मुस्लिम बांधवांनी कट्टरवाद्यांना या उपक्रमातून जणू चपराकच दिली अाहे.

 

राजकीय स्वार्थासाठी जातीच्या भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न हाेत असतात. एकमेकांच्या धर्म-जातीविषयी अपप्रचार, गैरसमज निर्माण करून दरी निर्माण केली जाते. ही बाब अाेळखून जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे रजापुरातील महेबूब मशिदीत हिंदू बांधवांना निमंत्रित केले हाेते. नमाज, धर्मगुरूंचे प्रवचन, मेहराब याबाबत माहिती हिंदू बांधवांनी जाणून घेतली. मुस्लिम बांधवांनी शांती अबाधित ठेवण्यासह इस्लामची शिकवण मानवतेवर अाधारलेली असल्याचा संदेश देणारे ठरले अाहे. याप्रसंगी माैलाना फिराेज अाझमी, डाॅ. इब्राहिम खान काटेवाले, अनिल पाटील, जितेंद्र वाघ उपस्थित हाेते.

 

संवादातून गैरसमज दूर

हिंदू व मुस्लिम बांधवांनी संवाद साधत मनातील गैरसमज दूर केले. मशिद, मदरसा, कुराण, नमाज, इस्लाम याविषयी विचारलेल्या प्रश्नांची डाॅ. इब्राहिम खान काटेवाले यांनी समर्पक उत्तरे दिली. कुराणातील श्लाेकांचे मराठीत अनुवाद करून सर्व धर्मांची शिकवण एकच अाहे, हे समजावून सांगितले.

 

प्रार्थनास्थळे मानवतेचे प्रतीक
भगवंताने मानव जातीसाठी प्रार्थनास्थळाची निर्मिती केली अाहे. मशिदीत फक्त मुस्लिमांनाच प्रवेश दिला जाताे असे नाही. अामच्या साेबत हिंदू बांधवांनी मशिदीत बसून इस्लामचे विचार एेकून घेतले. अाम्हीही मंदिरात जावून हिंदू धर्माची शिकवण जाणून घेऊ.
- डाॅ. इब्राहिम खान काटेवाले, जमियत-ए-इस्लामी हिंद

 

विचारांचे अदान-प्रदान व्हावे

विचार जखडून ठेवल्याने धर्म विशिष्ट लाेकांपुरता मर्यादित राहताे. धर्मातील चांगले अाचरण व विचारांचे अदान-प्रदान हाेत नाही, ताेपर्यंत गैरसमज दूर हाेणार नाहीत. मंदिर परिचय कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांना सहभागी करून घेणार अाहाेत.
- अनिल पाटील, संभाजी ब्रिगेड

 

बातम्या आणखी आहेत...