आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपाेषणमुक्तीसाठी 592 गावांत हाेणार स्वतंत्र बालविकास केंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील चार जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कुपाेषण असल्याचा ठपका केंद्राच्या निती अायाेगाने ठेवल्यानंतर खडबडून जाग अालेल्या प्रशासनाने कुपाेषणमुक्तीसाठी ठाेस पावले उचलली अाहे. यावर उपाययाेजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. नरेश गिते यांनी शासनाला अभिनव याेजना सादर केली. या याेजनेस तत्काळ मान्यता मिळाल्याने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५९२ गावांत ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात येणार अाहे. यासाठी शासन निर्णयात बदल करण्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे व प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी हिरवा कंदील दिला अाहे. 


निती अायाेगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील चार जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कुपाेषण असणे ही बाब जिल्ह्यासाठी वेदनादायी ठरली. सर्व दृष्टीने सधन असलेल्या नाशिक जिल्ह्यात कुपोषण असणे लाेकप्रतिनिधींसह प्रशासनाचीही मान झुकविणारी अाहे. जिल्हा परिषदेला तीन महिन्यांपूर्वीच लाभलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गिते यांच्या पाठीशी प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांनी कुपाेेषण निर्मूलन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत जाेखीमयुक्त गावांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला. या प्रस्तावावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे अाणि महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी विचार विनिमय करून शासन निर्णयात बदल करण्याचे संकेत देत प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करण्याचे अादेश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुपाेषणावर कशा प्रकारे काम करावे यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी ,गट विकास अधिकाऱ्यांपासून अंगणवाडी सेविका व अाशा कार्यकर्ती अशा प्रत्येक घटकांपर्यंत प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिला. एप्रिल महिन्याच्या अखेर हे प्रशिक्षण पूर्ण हाेणार अाहे. त्यानंतर प्रत्यक्षात कुपाेषण मुक्तीच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी हाेणार अाहे. यासाठी एमएसडब्ल्यू व स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार अाहे. 


बाल विकास केंद्रांमुळे थेट गरजूंपर्यंत लाभ पाेहचविणे सहज शक्य हाेणार अाहे. यासाठी बालकांचे सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन घेण्यात येणार आहे. यामधून जी बालके तीव्र कुपोषित असतील अशा बालकांसाठी बाल उपचार केंद्र, राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र व ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून उपचार, पोषक आहार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. 


या बालकांच्या पालकांना गृहभेटीद्वारे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्यात महिला व बालविकासासाठी किमान १० टक्के खर्च राखीव ठेवण्यात येणार अाहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षकांमार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले अाहे. प्रशिक्षणानंतर उपकेंद्रनिहाय बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात आले असून ० ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. 

 

निधीची कमतरता नाही 
कुपाेषणमुक्तीबाबत ग्रामविकास मंत्री व प्रधान सचिवांची भूमिका सकारात्मक अाहे. त्यामुळे यासाठी भरीव निधी उपलब्ध हाेणार अाहे. जिल्हाधिकारीही नियाेजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार अाहे. त्यामुळे अागामी काळात नक्कीच कुपाेषणावर मात करणे सहज शक्य हाेणार अाहे. 
-डाॅ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक 

बातम्या आणखी आहेत...