आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक बिघाडामुळे ‘सुखाेई’ विमान काेसळले; पॅराशूटने उडी घेतल्याने दोन वैमानिक बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- अाेझरच्या (जि. नाशिक) विमानतळावरून बुधवारी सकाळी १०.३० वाजता चाचणीसाठी उड्डाण घेतलेले सुखाेई -३० एमकेअाय -एसबी २१० हे लष्कराचे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या २० मिनिटांतच निफाड तालुक्यातील गोरठाण व वावी शिवारात कोसळले. प्रसंगावधान राखत दाेन्ही पायलटनी पॅराशूटद्वारे उडी घेतल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र तब्बल ३५७.१४ काेटी रुपये किमतीचे हे विमान चक्काचूर झाले.   


ओझर विमानतळावरून सुखाेई विमानाने बुधवारी सकाळी उड्डाण घेतले. विंग कमांडर लगनजित बिस्वाल व प्रशांत नायर हे दाेन वैमानिक त्यात हाेते. मात्र काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात अाल्यानंतर नायर व बिस्वाल यांनी ओझर येथील एअर ट्राफिक कंट्राेलशी संपर्क साधून माहिती दिली. तसेच इमर्जन्सी इजेक्‍टेबल पायलट स्वीच वापरून पॅराशूटद्वारे दाेघांनीही उड्या घेऊन जीव वाचवले. काही क्षणांतच गोरठाण व वावी अशी दोन गावांची सीमा असलेल्या अशोक निकम यांच्या शेतात विमान काेसळले. त्या वेळी माेठा स्फाेट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  या ठिकाणी शेतात काम करणारे श्याम निफाडे हे गंभीर जखमी झाले. 


अावाज एेकून  परिसरातील गावकरी माेठ्या संख्येने जमा झाले. विमानाचे तुकडे तीन ठिकाणी विखुरले हाेते. काही वेळातच हवाई दलाचे पथकही दाेन विशेष हेलिकाॅप्टरने घटनास्थळी दाखल झाले. द्राक्ष, डाळिंबाच्या बागेत पडलेले विमानाचे अवशेष गाेळा करताना त्यांना माेठी कसरत करावी लागली. त्यातच उच्चदाबाच्या विद्युत तारांचाही अडथळा हाेता. विमान काेसळले त्या ठिकाणी ३० बाय ३० चा माेठ्ठा खड्डा पडला हाेता.   


उच्चदाब वीज सुरू असती तर...  
ज्या ठिकाणी विमान काेसळले तिथे गोरठाण व व्हावी या दोन गावांची सीमा आहे. घटनास्थळावरून उच्चदाबाची वीज वाहिनी गेलेली अाहे. त्याला विमान धडकले. सुदैवाने या तारांमध्ये घटनेच्या वेळी वीजप्रवाह नव्हता, अन्यथा परिसराचे माेठे नुकसान झाले असते. घटनास्थळापासून जवळच राजेंद्र रसाळ यांची वस्ती हाेती. त्यांच्या घरात १० ते १५ सदस्य हाेते, मात्र सुदैवाने त्यांना या दुर्घटनेपासून काहीही हानी पाेहाेचली नाही.  


ब्लॅक बॉक्समधून कळेल कारण 
प्रथमदर्शनी या विमानाचा अपघात झाल्याचेच दिसून येते. दोन पायलट सुखरूप बाहेर पडले आहेत. एक शेतकरी त्यात जखमी झाला आहे. विमानाचा ब्लॅक बाॅक्स सापडला अाहे, त्यातील माहितीच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच या अपघातामागाचे नेमके कारण स्पष्ट हाेईल.  एचएएल आणि एअरफोर्स यांची संयुक्त समिती हे काम करत आहे. ती समिती संरक्षण मंत्रालयास अहवाल सादर करेल.   
- बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी, नाशिक


१६ वर्षांतील पहिला अपघात  
सुखोई ३० या लढाऊ विमानाच्या जुळणीचे व देखभालीचे काम अाेझर एचएचएलमध्ये होते. त्यासाठी अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. सोळा वर्षांत नाशिकला उड्डाणादरम्यान झालेला हा पहिला अपघात आहे. त्याची हवाई दलाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी पंजाब, आसाम, राजस्थान आदी ठिकाणी या विमानांचे अपघात झाले आहेत.   


पायलट अडकला झाडावर   
पॅराशूटद्वारे उडी घेतलेले दोघेही वैमानिक शेतात येऊन पडले. त्यापैकी बिसवाल हे लिंबाच्या झाडावर अडकून पडले होते.  हे लक्षात आल्यावर काही युवकांनी तातडीने झाडावर चढून त्यांना सुखरूप खाली उतरवले. तर प्रशांत नायर हे द्राक्षबागांवर पडल्याने त्यांच्या कमरेला दुखापत झाल्याची माहिती या युवकांनी दिली.  


देवाची कृपाच म्हणून थाेडक्यात वाचलाे !
दुर्घटनेत विमानाचे अवशेषांचा मार लागल्याने जखमी झालेला शेतकरी  शाम निफाडेची अापबीती, त्याच्याच शब्दांत...

माेठ्ठा अावाज झाला म्हणून मी वर पाहिले.... द्राक्षबागेतून धुराचा लाेट माह्या अंगावर येत हाेता...काही ॅतरी वेगळंच व्हतंय  म्हणून मी पळत सुटलो.... एक विमान माह्या अंगावर पडत असल्याचे भासले... अाता अापलं काही खरं नाही म्हणत पळू लागलाे... पळता पळता द्राक्षबागाच्या तारेमध्ये माझा पाया अडकला आणि कोसळलो.. माझ्याजवळच मोठा आवाज होऊन विमान कोसळलं.... तुकडे तुकडे झाले. त्यातील काही तुकडे माझ्या आजूबाजूला येऊन पडले. माझ्या हातावरही तुकडा आदळला... काही वेळातच मी बेशुद्ध झालाे... पुढं काय झालं माहीत नाही....  


आता मला तो आवाज ऐकला तरी भीती वाटते, माझे अजूनही कान भरून येत आहेत. तो क्षण मरेपर्यंत विसरणार नाही....आता विमानाचा आवाज येथून पुढे जेव्हा मला एेकू येईल त्या वेळी हा क्षण माझ्या डोळ्यासमोर नक्की येईल. देवाची कृपा म्हणून मी थोडक्यात वाचलो......मी डोळ्याने माझा मृत्यू पाहिला....  बेशुद्धावस्थेत पडलेल्या श्याम निफाडे यांना जवळच राहणारे शिवनाथ जगताप व त्यांचा मित्र राहुल गायकवाड या दोघांनी तातडीने पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून विमानाच्या मोठ्या आवाजामुळे कान दुखावला गेल्याची तसेच हाताला मार लागल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात अाली.  
(शब्दांकन : नीलेश देसाई, लासलगाव)

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..विमान अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...