आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांना वाचवण्याच्या नादात वडिलांसह दोन मुले वाहून गेली; नांदूर मध्यमेश्वर कालव्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- महालखेडा येथे नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्यातील वेगवान प्रवाहात फवारणी यंत्रामध्ये पाणी भरत असताना शेतकरी कुटुंबातील दोन शाळकरी मुलांसह त्यांचे वडील वाहून गेले. ही दुर्घटना साेमवारी घडली. घटनेला सहा तास उलटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गांभीर्य दाखविल्याने ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट होती. कालव्याचे पाणी वेळेवर बंद न केल्याने मृतदेहांची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या दरम्यान कालव्याचे पाणी पूर्णतः बंद केल्याची माहिती सहायक अभियंता ससाणे यांनी दिली. परंतु, प्रवाहाचा वेग कमी होण्यास २४ तासांपेक्षाही अधिक वेळ लागेल, अशी माहिती उपस्थितांनी दिली.  


एक्स्प्रेस कालव्यालगत सोमनाथ शिवराम गिते यांचे शेत आहे. त्यांचा मोठा मुलगा कार्तिक (१४) हा कांद्याच्या फवारणी यंत्रामध्ये पाणी भरण्यासाठी बादली घेऊन कालव्यात उतरला. यावेळी पायऱ्यांवरून पाय घसरल्याने तो कालव्यात पडला. वेगवान प्रवाहात तो वाहून जात असल्याचे बघून त्याचे वडील सोमनाथ (४०) त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांचाही पाय घसरला. वडील आणि मोठा भाऊ कालव्यात वाहून जात असल्याचे पाहून लहान मुलगा सत्यम (१२) यानेही कालव्याकडे धाव घेतली. पाय घसरल्याने प्रवाहात तोही वाहत गेला. दरम्यान,  तेथे उपस्थित असलेले कार्तिकचे काका अमोल गिते (३६) यांनीही कालव्याकडे धाव घेतली. मात्र, अमोल घसरून पडत असताना सुरेश मोरे या १९ वर्षीय मुलाने त्यांना वाचवले. 


मृतदेहांच्या शोधासाठी लावली जाळी
प्रशासनाकडून उदासीनता दाखविण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनीच मृतदेहांची शोधमोहीम दुपारपासूनच स्वतःच्या हाती घेतली. घटनास्थळापासून महालखेडा- येवला रस्त्यानजीक सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कालव्यात पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहिमेसाठी जाळी लावण्यात आली. सायंकाळी सात वाजता तहसीलदार नरेशकुमार बहिरम व पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी घटनास्थळी हजेरी लावली. नांदूरमध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याचे सहायक अभियंता ससाणे हे साडेसात वाजता घटनास्थळावर हजर झाले. यानंतर कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी वेग आला.

बातम्या आणखी आहेत...