आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेपींनी फक्त हत्याच केल्या नाहीत, तर क्रूर आनंदही घेतला, त्यांना फाशीच हवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोठलेल्या रक्ताने केलेला कट, जातीय भावनेतून केलेली हत्या आणि शरीराचे आठ तुकडे करून गाठलेली क्रौर्याची परिसीमा यामुळे सोनई हत्याकांडातील सर्व सहाही अाराेपींना मृत्युदंडाचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी नाशिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्याकडे केली. आजही जातीय व्यवस्था एवढ्या तीव्र असणे ही समाजातील शोकांतिका अाहे.  सामाजिक हिताच्या दृष्टीने आणि न्यायव्यवस्थेवरील समाजाचा विश्वास राखण्याच्या उद्देशाने या सर्व आरोपींना मृत्युदंडाचीच शिक्षा गरजेची असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तर अाराेपींपैकी मुलाच्या व वडिलांच्या वयाचा विचार करून त्यांना शिक्षेत सवलत मिळावी, अशी मागणी आरोपींचे वकील  अविनाश भिडे आणि अॅड. एस. एस. उदास यांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर सहाही दाेषींना २० जानेवारी राेजी शिक्षा सुनावणार असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.  


१ जानेवारी २०१३ रोजी नगर जिल्ह्यातील सोनई  येथील सचिन घारू, राहुल कंडारे व संदीप थनवार या सफाई कर्मचारी तरुणांची हत्या करण्यात अाली हाेती. मृत सचिनसोबत मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने मुलीच्या नातलगांनी हे हत्याकांड घडवून अाणल्याचे सिद्ध झाले अाहे. या प्रकरणी मुलीचे वडील पोपट दरंदले, भाऊ गणेश दरंदले, काका प्रकाश आणि रमेश दरंदले, आत्येभाऊ संदीप कुऱ्हे व ट्रॅक्टरचालक अशोक नवगिरे यांना  न्यायालयाने दाेषी ठरवले अाहे.  


अाराेपींचे वकील : ‘कमीत कमी शिक्षा व्हावी’
- प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही  
- मुलीच्या भावाचे वय कमी आहे  
- मुलीच्या वडिलांनी साठी पार केली आहे  
- गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहेत 


सरकारी वकील :‘मृत्युदंडाचीच शिक्षा द्यावी’
- २२ परिस्थितिजन्य पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध  
- कृत्याचे परिणाम ज्ञात, वयाचा प्रश्न नाही  
- घटनेनंतरही आरोपींना पश्चात्ताप नाही  
- मृत नि:शस्त्र होते, त्यांनी उद्युक्त केले नाही 


प्रेमसंबंधांचे नाटक पोलिसांनी रचले
या प्रकरणामुळे गेल्या पाच वर्षांपासून आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मुलीचे प्रेमसंबंध वगैरे काही प्रकार नव्हता. पोलिसांनी हा बनाव रचला. आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू.  
- शंकर दरंदले, आरोपींचा चुलत भाऊ  


या ११ कारणांसाठी सरकारी वकिलांनी केली अाराेपींना मृत्युदंडाची मागणी 
१. सचिन हा मागास असल्याने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने दरंदले कुटुंबीयांनी या तिघांची हत्या केली  
२. घटनेच्या सकाळी १० ते दुपारी ३.३० या दरम्यान तिन्ही मृत दरंदलेच्या घरी असल्याचे सिद्ध झाले आहे.  
३. पंधरा दिवसांपूर्वी सवर्ण दरंदले कुटुंबाने अनुसूचित जातीच्या सचिनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सिद्ध झाले. 
४. मृत सचिनने सवर्ण मुलीशी लग्न करण्याचा निश्चय व्यक्त केला होता.  
५. लग्नाला विराेध असल्याने दरंदलेंनी सचिनला मारण्याचा कट रचला. नवगिरेमार्फत सचिनच्या मित्रांना बोलावणे पाठवले.  
६. नवगिरेने संदीप आणि राहुलसह सचिनला दरंदले वस्तीवर संडासची टाकी साफ करण्यासाठी नेले.  
७. संदीपचे प्रेत संडासच्या टाकीत सापडल्याची खोटी माहिती पोपट आणि प्रकाश दरंदले यांनी सोनई पोलिसांना देऊन खोटा पुरावा तयार केला.  
८. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने थंड डोक्याने आणि क्रूर पद्धतीने हे तिन्ही खून केल्याचे परिस्थितिजन्य पुराव्यांतून न्यायालयात सिद्ध झाले आहे.  
९. सवर्ण मुलगी फितूर झाली असली तरी २ जानेवारीस घरी प्रॉब्लेम झाल्याने ती कॉलेजला न गेल्याची साक्ष पुढे आली आहे. कॉलेजला न जाण्याचे कारण तिला न्यायालयात सांगता आले नाही.  
१०.सर्व आरोपींचा सचिनवर प्रचंड राग असल्याने त्यांनी त्याच्या शरीराचे आठ तुकडे करून बोअरमध्ये लपवले, शीर कापून विहिरीत टाकले.  
११. प्रत्यक्षदर्शी राहुलच्या डोक्यात घाव घालून, तर संदीपला टाकीत उलटे गुदमरून टाकून अाराेपींच्या वतीने त्यांची हत्या करण्यात अाली.

 


हेही वाचा, 
> साेनई हत्याकांड; पुनर्जन्मावर विश्वास नाही, परंतु आरोपींचे कृत्य पाहून राक्षसांची आठवण होते...
> शिक्षा देण्यापूर्वी नार्काे चाचणी करा, मगच मुलास फाशी द्यावी;अाराेपीच्या अाईची मागणी... 

 

 

नेमके काय होते, सोनई हत्याकांड प्रकरण वाचा पुढील स्लाइड्सवर... विशेष सरकारी वकील काय म्हणाले त्याचा व्हिडिओ पाहा अखेरच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...