आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- सोनई हत्याकांडातील आरोपी असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांसह त्यांचा एक साथीदार अशा सहा आरोपींना नाशिकच्या सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘हा गुन्हा दोन कुटुंबांतील वादातून नाही, तर जातीय मानसिकतेतून झालेला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने तुम्हाला जिवंत सोडणे, हे समाजाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने, तीन निष्पाप तरुणांची निर्घृण, निर्दय आणि क्रूर हत्या केल्याबद्दल तुम्हाला मरेपर्यंत फाशी, सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे,’ असा निकाल न्यायाधीश वैष्णव यांनी दिला. आरोपींकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेतून पीडितांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश त्यांनी सरकारी पक्षाला दिले.
नाशिकच्या विशेष सत्र न्यायालयात सोनई खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. १ जानेवारी २०१३ रोजी नगरमधील सोनई गावात आंतरजातीय प्रेमसंबंधांच्या रागातून दरंदले या सवर्ण कुटुंबातील मुलीचे वडील पोपट, भाऊ गणेश, काका रमेश व प्रकाश, आतेभाऊ संदीप कुरे आणि त्यांचा साथीदार अशोक नवगिरे यांनी सेप्टिक टँक साफ करण्याच्या बहाण्याने बाेलावून सचिन घारू, राहुल कंडारे व संदीप थनवार या सफाई कर्मचाऱ्यांची हत्या केली हाेती.
- मरेपर्यंत फाशी, सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येक दोषीस १० हजार रुपयांचा दंड ठोठावला
- दोषींकडून वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेतून पीडितांच्या कुटुंबांना दिली जाणार नुकसान भरपाई
- कटात प्रत्येक व्यक्ती सारखीच जबाबदार असते...
- जातीय मानसिकतेतून तीन निष्पाप तरुणांचे हकनाक बळी
- आरोपी म्हणजे मानवी शरीर धारण केलेले सैतान आहेत...
माणुसकीला कलंक न्यायाधीश आर. आर. वैष्णव
शिक्षा सुनावताना न्यायाधीश अार. अार. वैष्णव म्हणाले : आरोपींचे हे कृत्य अत्यंत निर्दयी, क्रूर आणि निर्घृण आहे. त्यांनी उच्चजातीच्या भावनेने अांधळे होत मानवी मूल्यांची हत्या केली आहे. कुणीही उच्च जातीत जन्माला आला म्हणून उच्च होत नाही. दुसऱ्याच्या दु:खाने ज्यांना वेदना होतात, ते उच्च ठरतात. जातीयवाद ही समाजाला लागलेली एचआयव्हीसारखी कीड आहे. त्याचे भस्मासुरात हाेणारे रूपांतर रोखले पाहिजे. हा गुन्हा दोन कुटुंबांमधील वाद नाही, तर जातीय मानसिकतेतून झालेल्या हत्या आहेत. आरोपींनी फक्त या तिघांची नाही तर मानवी मूल्यांची हत्या केली. सामाजिक विद्वेषातून हा गुन्हा केला. त्यामुळे शिक्षा कमी करण्याचे त्यांचे निवेदन विचारात घेता येणार नाही. पोपट दरंदले साठ वर्षांचे तर गणेश तरुण असल्याच्या मुद्द्यावर शिक्षेत सवलत देता येणार नाही. ज्या मुलांच्या हत्या करण्यात आल्या तेही तरुण होते, सचिन आणि राहुल हे अविवाहित होते, सचिनची आई कलाबाई हीदेखील साठ वर्षांची निराधार वृद्धा आहे. अशोक नवगिरेचेही त्याचा या गुन्ह्यात संबंध नसल्याचे म्हणणे आहे. परंतु, गुन्ह्यातील त्याचा सहभाग सिद्ध झाला आहे.
असा झाला होता अंतिम युक्तीवाद...
अाराेपींचे वकील : ‘कमीत कमी शिक्षा व्हावी’
- प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही
- मुलीच्या भावाचे वय कमी आहे
- मुलीच्या वडिलांनी साठी पार केली आहे
- गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहेत
सरकारी वकील :‘मृत्युदंडाचीच शिक्षा द्यावी’
- 22 परिस्थितिजन्य पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध
- कृत्याचे परिणाम ज्ञात, वयाचा प्रश्न नाही
- घटनेनंतरही आरोपींना पश्चात्ताप नाही
- मृत नि:शस्त्र होते, त्यांनी उद्युक्त केले नाही
काय म्हणाला आरोपीचा भाऊ...प्रेमसंबंधांचे नाटक पोलिसांनी रचले!
या प्रकरणामुळे गेल्या पाच वर्षांपासून आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मुलीचे प्रेमसंबंध वगैरे काही प्रकार नव्हता. पोलिसांनी हा बनाव रचला. आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू.
- शंकर दरंदले, आरोपींचा चुलत भाऊ
या 11 कारणांसाठी सरकारी वकिलांनी केली आरोपींना मृत्युदंडाची मागणी
1. सचिन हा मागास असल्याने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने दरंदले कुटुंबीयांनी या तिघांची हत्या केली
2. घटनेच्या सकाळी 10 ते दुपारी 3.30 या दरम्यान तिन्ही मृत दरंदलेच्या घरी असल्याचे सिद्ध झाले आहे.
3. पंधरा दिवसांपूर्वी सवर्ण दरंदले कुटुंबाने अनुसूचित जातीच्या सचिनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सिद्ध झाले.
4. मृत सचिनने सवर्ण मुलीशी लग्न करण्याचा निश्चय व्यक्त केला होता.
5. लग्नाला विराेध असल्याने दरंदलेंनी सचिनला मारण्याचा कट रचला. नवगिरेमार्फत सचिनच्या मित्रांना बोलावणे पाठवले.
6. नवगिरेने संदीप आणि राहुलसह सचिनला दरंदले वस्तीवर संडासची टाकी साफ करण्यासाठी नेले.
7. संदीपचे प्रेत संडासच्या टाकीत सापडल्याची खोटी माहिती पोपट आणि प्रकाश दरंदले यांनी सोनई पोलिसांना देऊन खोटा पुरावा तयार केला.
8. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने थंड डोक्याने आणि क्रूर पद्धतीने हे तिन्ही खून केल्याचे परिस्थितिजन्य पुराव्यांतून न्यायालयात सिद्ध झाले आहे.
9. सवर्ण मुलगी फितूर झाली असली तरी २ जानेवारीस घरी प्रॉब्लेम झाल्याने ती कॉलेजला न गेल्याची साक्ष पुढे आली आहे. कॉलेजला न जाण्याचे कारण तिला न्यायालयात सांगता आले नाही.
10.सर्व आरोपींचा सचिनवर प्रचंड राग असल्याने त्यांनी त्याच्या शरीराचे आठ तुकडे करून बोअरमध्ये लपवले, शीर कापून विहिरीत टाकले.
11. प्रत्यक्षदर्शी राहुलच्या डोक्यात घाव घालून, तर संदीपला टाकीत उलटे गुदमरून टाकून अाराेपींच्या वतीने त्यांची हत्या करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर, ५० वी फाशी..., नेमके काय होते, सोनई हत्याकांड प्रकरण आणि फोटो ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.