आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

470 पेक्षा जादा रुग्णालयांत सुविधेस विमा कंपनीचा नकार, राज्यातील 230 रुग्णालये वेटिंगवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोरगरीब-अल्प उत्पन्न धारकांना गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध करून देणाऱ्या 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने'च्या नावात बदल करून राज्य शासनाने 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' असे केले. जानेवारी २०१८ पासून योजनेत बदल करण्यासाठी रुग्णालयाची संख्या ४७० वरून ७०० करण्याच्या निर्णयासह ९७१ आजारांची संख्या वाढवून ११०० करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, विमा कंपनीने ४७० पेक्षा जास्त रुग्णालयात योजनेची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे सांगितल्याने शासनाची अडचण झाली आहे. मात्र, कंपनीने बदल करण्यास नकार दिल्याने उर्वरीत २३० रुग्णालयांत सुविधा मिळण्याची घोषणा हवेतच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये वाढीव उपचारांच्या समावेशासह उपचारांचे पॅकेज वाढवण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती.

 

कॅन्सर, हृदयविकार अशा मोजक्याच उपचार, शस्त्रक्रियांसाठी असलेल्या पूर्वीच्या जीवनदायी योजनेत आमुलाग्र बदल करून ९७१ प्रकारच्या उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रियांचा समावेश राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत करण्यात आला. त्याची अंमलबजावणी २०१२ पासून राज्यात झाली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णाला नामांकित खासगी रुग्णालयात पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध झाले. एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना, केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना ही योजना लागू करण्यात आली होती. ही योजना राज्यातील ४७० रुग्णालयात लागू करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात ३० रुग्णालयात ही योजना सध्या सुरू आहेत. उपचारांचे पॅकेज कमी असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे योजनेची व्याप्ती वाढवण्याची मागणी होती.

 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'राजीव गांधी योजने'चे नाव सुधारणांसह 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' करण्याचे जाहीर केले होते. आरोग्य मंत्र्यांनीही १३२६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यानंतरही योजनेची अंमलबजावणी नव्हती. दरम्यान, गेल्या वर्षी १३ एप्रिल रोजी योजनेच्या नामांतराचा शासन आदेश काढण्यात आले. मात्र, हा आदेश केवळ नामांतराचा होता. योजनेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नव्हते. जानेवारी २०१८ पासून योजनेत मोठ्या प्रमाणावर बदल केले जातील, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

 

विमा कवच कागदावरच
'राजीव गांधी'मध्ये संपूर्ण कुटुंबाला एका वर्षासाठी दीड लाखांपर्यंतचे विमा कवच होते. नव्या योजनेत कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे विमा कवच मिळणार असे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, योजनेत कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याने विमा कवच दीड लाखावरच आहे.


विमा कंपनीचा नकार
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या नावात बदल करून राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना असे केले आहे. या योजनेत जानेवारीपासूनच बदल होणार होते. मात्र, विमा कंपनीने बदल करण्यास नकार दिल्याने जुन्या योजनेच्या सुविधा रुग्णांना दिल्या जात आहे. ३१ मार्चपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
- डॉ. वैभव बच्छाव, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनअाराेग्य याेजना

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जिल्‍हाभरात 30 रुग्‍णालयात योजना...

बातम्या आणखी आहेत...