आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयलयुक्त शिवार अभियान: 97 टक्के गावे जलयुक्त करुन नाशिक विभाग राज्यात अव्वल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी भूजल पातळीत वाढ करणे महत्वाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी केवळ शासकीय निधीच नव्हे तर लोकसहभागाचा मोलाचा वाटा ठेवला. त्यामुळे २०१६- १७ या वर्षामध्ये या अभियानात राज्यातील ४ हजार ४३९ गावे जलयुक्त झाली. यामध्ये नाशिक विभागाने निवड झालेली ९७ टक्के गावे जलयुक्त करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या पुढाकारातून नाशिक जिल्ह्यात या मोहिमेत निवड झालेली ९९ टक्के गावे जलयुक्त करण्यात आली. उर्वरित दुष्काळजन्य गावांचीही लवकरच निवड करण्यात येणार आहे. 


राज्यात सरासरी इतका पाऊस होत असला तरी दुष्काळी परिस्थिती राहत असल्याने त्याचा कृषीसह इतर क्षेत्रावर परिणाम दिसून येत होता. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभाग, वन विभाग, जलसंपदा विभागासह इतर विभागाच्या माध्यमातून राज्यात जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. यासाठी प्रत्येक विभागात ९०० गावे दरवर्षी जलयुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या अभियानामध्ये केवळ शासकीय निधीचाच वापर न करता सामाजिक संस्था, कंपन्या, स्थानिक नागरिकांचा पुढाकार महत्वपूर्ण ठरला. राज्यात ५ हजार २८८ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू करण्यात आली होती. यापैकी ४ हजार ४३९ गावामध्ये संपूर्णपणे जलयुक्त शिवारची कामे झाली आहेत.


६४३ गावांमध्ये ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सध्या भूजल पातळीत वाढ झाल्याचे चित्र असले तरी काही गावांमधील जलयुक्त कामांमध्ये संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे चित्र आहे. सुरुवातीला ठेकेदारांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी आपले चांगभलं करण्यासाठी ३ लाख रुपयांच्या आतील कामांना अधिक प्राधान्य दिले होते. याबाबत वृत्तपत्रामधून टीकेची झोड उठल्यानंतर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी विशेष लक्ष घालून लहान लहान कामे एकत्रित करून त्यांचे मूल्य तीन लाखापेक्षा अधिक करून इ-टेंडरच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला लगाम घातला. नालाबांध, दगड बांध आणि मजगीमध्ये आर्थिक अपहार झाल्याचेही चित्र अाहे. त्याबाबत चौकशी करावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. 

 

अहवाल सादरीकरणातही विभाग अव्वल 
राज्यात नाशिक विभागात जलयुक्त कामे पूर्ण करण्याबरोबरच राज्य शासनाला त्याची माहिती त्वरीत उपलब्ध करून देण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 
- बाबासाहेब जेजूरकर, विभागीय कृषी अधीक्षक, रोहयो 


जलयुक्त शिवारसाठी लाभले तीन आयुक्त 
राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले तेव्हा नाशिक विभागात विभागीय महसूल आयुक्तपदी एकनाथ डवले होते. त्यांनी या अभियानाची यशस्वी सुरुवात केली. त्यानंतर महेश झगडे यांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त गावे (८० टक्के) जलयुक्त झाली. २०१६-१७ मध्ये राजाराम माने यांच्या कार्यकाळात काम पुढे गेले. त्यामुळे नाशिक विभागातील जलयुक्त कामांमध्ये तीन विभागीय आयुक्तांचा हातभार आहे.

 
विभागात नाशिक जिल्हा अव्वल 
नाशिक विभागात पाच जिल्हे असून जलयुक्त शिवार अभियानामध्ये नाशिक जिल्ह्यातील ९९ टक्के गावे जलयुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांचा महत्वाचा पुढाकार असून त्यांनी या अभियानावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. 


राज्यातील जलयुक्त गावांची टक्केवारी
१०० टक्के : ४४३९, 
८० टक्के : ६४३, 
५० टक्के : १८२, 
३० टक्के : २१ 

बातम्या आणखी आहेत...