आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त मराठवाड्याचा नव्हे, तर मी भारतीय! ‘दिव्य मराठी’ लिटफेस्टमध्ये देशमुख यांचा संवाद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘मराठवाडाच नव्हे तर विदर्भातीलही काही किंगमेकर्स अाहेत. मुंबई, पुण्यातील लाेकही अाहेत तेदेखील प्रयत्न करत. पण, अाम्ही त्या विषयाकडे फारसे जात नाही. कारण शेवटी अाम्ही उभे राहिलेलाे अाहेत, अाम्हाला काेणी उभे केलेले नाही. हे जे किंगमेकर्स अापण म्हणताे ते अामचे मतदारच अाहेत. त्यामुळे अापल्या पसंतीचा माणूस निवडून यावा असं जर काेणाला वाटत असेल तर त्यात गैर नाही,’ असे मत  माजी सनदी अधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक व नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ३ ते ५ नाेव्हेंबर दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या ‘दिव्य मराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये  व्यक्त केले हाेते. ‘संवाद संमेलनाध्यक्ष पदाच्या उमेदवारांशी’ या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. देशमुख संमेलनाध्यक्षपदी निवडून अाल्यानिमित्ताने त्या संवादाचा हा सारांश प्रश्नाेत्तर स्वरूपात...


अापण जेव्हा अर्ज दाखल केला तेव्हा लक्ष्मीकांत देशमुख काेण असा प्रश्न अनेकांना पडला हाेता?  
प्रत्येक वाचक महिन्याला २० किंवा २५ पुस्तकं वाचताे. काही जण पुस्तकं वाचत असतील, काही वाचत नसतीलही. याचा अर्थ ताे लेखक माहिती असताेच, वा नसताेच असे नाही. त्यामुळे एखाद्या माणसाने ‘काेण देशमुख’ म्हणणे काही गैर नाही. अाम्ही काही व्यास, वाल्मीकी किंवा शेक्सपिअर नाही. अाम्ही अामच्या परीनं वाङ‌्मयसेवा केली अाहे.

 

 जर चांगली वाङ्ममय सेवा सुरू अाहे तर संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा हा अाटापिटा कशासाठी?

 अाटापिटा कुठे अाहे? हा शारदाेत्सव अाहे, या उत्सवात प्रत्येकाने अापली पालखी वाहायची असते. अाम्ही पाचही उमेदवारांनी तेच ठरवले अाहे. निवडून काेण येईल माहीत नाही, पण ही पालखी पुढे नेण्याचं काम अापण केलं पाहिजे ना...! ही निवडणूक म्हणजे दंगल, अाखाडा वा राजकारण नाही. अाम्ही सगळेच लेखक अाहाेत, प्रत्येकाने अापल्या परीने, अापल्या वृत्तीनुसार वाङ्मय निर्मिती केलेली अाहे.

 

 जर साहित्यात तुमचे एवढे चांगले काम सुरू अाहे तर मग या प्रक्रियेत सहभाग कशासाठी? 
साहित्य-साहित्यिक हा एक महत्त्वाचा घटक अाहे याची जाणीव सामान्य वाचकांना या संमेलनात हाेत असते. जेव्हा हजाराे लाेकं येतात, पुस्तकं पाहतात, कविसंमेलनाला येतात, परिसंवादात सहभागी हाेतात, तेव्हा साहित्यिक हा त्या दृष्टीने समाजव्यवहारातील एक प्रतिष्ठित घटक अाहे हे अधाेरेखित हाेत असते. केवळ मुख्यमंत्री वा उद्याेगपती हा महत्त्वाचा नाही,  माणसाचं मन घडविणारे साहित्यिक देखील महत्त्वाचे अाहेत. हा संस्कार माणसावर हाेत असताे त्यासाठी संमेलनाचे महत्त्व अाहे अाणि त्यासाठी अाम्हाला अामची भूमिका मांडायची असते म्हणून अामच्यासारखी माणसं या प्रक्रियेचा एक भाग हाेत असतात.

 

 तुम्ही संमेलनाध्यक्षपदानंतर काय काम करणार?

मराठी भाषा अाजच्या तरुणाची कशी भाषा हाेईल हा माझा पहिला प्रयत्न असेल. साेशल मीडिया, ई-अॅप्लिकेशन याचा मी अाधार घेणार अाहे. त्यासाठी माझ्या प्रशासकीय अनुभवांचा फायदा हाेणार अाहे. बृहन्महाराष्ट्राचे खूप माेठे प्रश्न अाहेत. त्या ठिकाणी मराठी भाषा टिकविण्याची अस्तित्वाची लढाई सुरू अाहे. त्यांचे शाळेचे, शिक्षकांचे, वाचनालयांचे, साहित्य, संस्थांचे प्रश्न अाहेत त्यावर मी काम करणार अाहे. संमेलन साधेपणाने पण चांगलं कसं हाेईल यावर माझा भर अाहे. त्यासाठी काेश निर्माण करण्याचा प्रयत्न अाहे. मराठी भाषा टिकायची असेल तर इंग्रजी वाढतं वर्चस्व कमी करू शकत नाही, पण त्या शाळांमध्ये मराठीची सक्ती का करू शकत नाही? इतर राज्यांमध्ये हाेऊ शकतं पण महाराष्ट्रात का हाेत नाही? तर यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार अाहे.

 

मराठवाड्यातीलच संमेलनाध्यक्ष नेमका कसा?

देशमुख : मी अनेकदा सांगितले की, मी महाराष्ट्रातील या संदर्भातील चारही घटक संस्था तसेच बृहन्महाराष्ट्राच्या पाच घटक संस्थांच्या वतीने उभा अाहे.  त्यामुळे मला सर्वत्र फिरलंच पाहिजे. फक्त माझ्या भागातील लाेक मला निवडून देणार नाहीत. मला नागपूरला गेलं पाहिजे, किंवा इतर उमेदवारांनाही इतरत्र फिरलं पाहिजे. त्यामुळे असं काही नाही की, मराठवाड्यातीलच संमेलनाध्यक्ष हाेणार. कुठेतरी प्रत्येकाच्या मनात त्याच्या गावाने घर केलेलं असतं. त्यामुळे काेणीही प्रादेशिक हाेत नाही, मी तर मुळीच प्रादेशिक नाही, मी अखिल भारतीय अाहे. कारण मी महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांमध्येे काम केले अाहे. याबराेबरच कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात अाणि उत्तर प्रदेशात अभ्यासानिमित्ताने माझं वास्तव्य झालेलं अाहे. माझे विचार भारतीय अाहेत.

बातम्या आणखी आहेत...