आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाच्या घशातील पाच रुपयांचे नाणे सिव्हिलमध्ये काढले अर्ध्या तासात; लॅरिंगोस्कोपीची शस्त्रक्रिया यशस्वी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या अडीच वर्षांच्या मुलावर लॅरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. अन्न आणि श्वासनलिकेत अडकलेले नाणे काढण्यात जाेखीम असल्याचे खासगी रुग्णालयाकडून सांगण्यात अाल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून मुलास 'सिव्हिल'मध्ये दाखल करण्यात आले होते. कान-नाक-घसातज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांच्या पथकाने अर्ध्या तासाच्या शस्त्रक्रियेद्वारे मुलास जीवदान दिले. 


अवघ्या अडीच वर्षांचा साई डगळे (रा. सिन्नर) घरात रांगत असताना कोपऱ्यात पडलेले पाच रुपयांचे नाणे त्याने गिळले. ते अन्न व श्वासनलिकेच्या मध्यभागी अडकल्याने चिमुकल्यास श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. दुपारी तीनच्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत त्याला सिन्नरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. एक्सरेद्वारे नाण्याची जागा पाहिल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी माेठा खर्च सांगत मुलगा वाचण्याबाबत साशंकता दर्शवली. साधारण परिस्थिती असलेल्या डगळे कुटुंबीयांनी अखेरचा पर्याय म्हणून सायंकाळी पाच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. एक्सरे बघून कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. संजय गांगुर्डे यांना लॅरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. शेळके यांच्या मदतीने भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार, डॉ. भूषण वडनेरे आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या टीमने अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. वैद्यकीय पथकाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी अभिनंदन केले. 


'सिव्हील'मध्ये तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी
नाणे गिळणाऱ्या मुलावर सिव्हिलमध्ये ही तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. यापूर्वी वैद्यकीय पथकाने मनमाड येथील पाच वर्षांची वैष्णवी आणि हिरावाडीत मामांकडे आलेला मुंबईचा निशांत नाईक या मुलावर लॅरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करत नाणे बाहेर काढले होते. 


पूर्ण भूल देणे जोखमीचे हाेती 
अडीच वर्षीय साईचे वजन अवघे दहा किलाे होते. नाणे श्वासनलिकेत अडकल्याने ताे अत्यवस्थ झाला होता. पाच रुपयांचे नाणे जाड असल्याने श्वास घेण्यास त्याला अडचण येत होती. अशावेळी पूर्ण भूल देणे जोखमीचे होते. अशा अवघड परिस्थितीत पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. 
- डॉ. सचिन पवार, भूलतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय 

बातम्या आणखी आहेत...