आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: शिक्षक मतदारसंघात मतदानादरम्यान राडा, केंद्राबाहेरच जोरदार हाणामारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिवसेना व टीडीएफ या पक्षाच्या उमेदवारांत राडा झाला. सोशल मिडियातून चुकीची माहिती दिल्याने शिवसैनिकांनी मतदानकेंद्राबाहेरच टीडीफ उमेदवारांच्या समर्थकांना जोरदार मारहाण केली. शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेतल्याचे संदेश टीडीएफचे उमेदवार प्रा. संदीप बेडसे यांच्या समर्थकांनी पसरवून शिक्षक मतदारात गैरसमज पसरविल्याचा आरोप आमदार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी खुला सहभाग घेतल्याने तसेच संस्थाचालक विरुध्द शिक्षक असाही सामना रंगणार असल्याने उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस वाढली आहे. विभागात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रमुख पाच उमेदवारांत खरी लढत होणार आहे. त्यामुळे शिक्षक आता कोणत्या उमेदवाराला पसंती देतात हे 28 जून रोजी मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 53 हजार 335 मतदारांनी नोंदणी केली असून यात 40 हजार 412 पुरुष तर 12 हजार 923 महिला मतदार आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी शिक्षक मतदारांसाठी ऐच्छिक विशेष सुटी मंजूर करण्यात आली आहे. 

 

शिक्षक मतदारांमध्ये टीडीएफ ही महत्वपूर्ण संघटना मानली जाते. परंतु, तिच्यामध्येच फूट पडल्याने दोन उमेदवारांनी टीडीएफचा आम्हांलाच पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र टीडीएफचेटीडीएफचे अध्यक्ष आणि सचिव यांनी प्रा. संदीप बेडसे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. तर भाऊसाहेब कचरे यांच्या पाठीमागे टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा होते. सध्या शिक्षकांनी शिक्षक मतदार हवा म्हणून मौखिक प्रचार सुरु केल्याने त्यामुळे खरी लढत आता शिक्षकांविरोधात संस्थाचालक यांच्यामध्ये होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आणि भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील हे संस्थाचालक असले तरी त्यांच्यामागे पक्षाची ताकद आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात एकूण 53 हजार मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रांताचा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. आपल्याच जिल्ह्यातील आमदार हवा म्हणून मतांची विभागणीही होणार आहे. 

 

दुसऱ्या पसंतीच्या मतदानासाठीही विनवणी-

 

काही प्रमुख उमेदवारांनी आपल्या विरोधातील उमेदवारांना दुसऱ्या पसंतीचे मत आम्हाला देण्यासाठी शिक्षकांना सांगावे म्हणूनही विनंती केली जात होती. त्यामुळे मत विभागणी होवून सर्वाधिक पसंतीचे मते मिळविणारा विजयी होणार आहे. अनिकेत पाटील (भाजप), किशोर दराडे (शिवसेना), संदीप बेडसे (टीडीएफ) यांच्यात खरी लढत होत आहे. 

 

जिल्हानिहाय उमेदवार असे-

 

नाशिक : अनिकेत पाटील (भाजप), किशोर दराडे (शिवसेना), प्रतापदादा सोनवणे, महादेव चव्हाण, मुख्तार कासीम
 
अहमदनगर : सुनील पंडीत, अजित दिवटे, आप्पासाहेब शिंदे, रवींद्र पटेकर, भाऊसाहेब कचरे, विठ्ठल पानसरे, बाबासाहेब गांगरडे 

 

धुळे : संदीप बेडसे (टीडीएफ), अशोक पाटील, विलास पाटील 

 

जळगाव : शालिग्राम भिरुड 

 

बातम्या आणखी आहेत...