आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या शैक्षणिक वर्षात मराठी, उर्दू आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नव्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या जोडीला राज्याच्या शिक्षण विभागाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही स्थापन करण्यात येत आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिली. 


प्रादेशिक विद्याप्राधिकरण येथे गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांसाठी आयोजित कार्यक्रमासाठी ते औरंगाबादेत आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवीन उपक्रमांबाबत माहिती दिली. मराठीसह उर्दू भाषेच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्यात, मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात येत आहे. बाहेर राज्यातील आणि परदेशातील शाळांनाही या मंडळाची संलग्नता देण्यात येणार असून, या मंडळासाठी स्वतंत्रपणे अभ्यासक्रमही तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच असलेल्या विविध बोर्डांच्या संख्येत नवीन भर नव्या शैक्षणिक वर्षात पडणार आहे. नंदकुमार म्हणाले, सध्या राज्य मंडळ म्हणजे एसएससी बोर्ड, केंद्रीय शिक्षण मंडळ, आयसीएसई आणि आयबी, आयजीसीएसई आदी बोर्ड आहेत. या जोडीला आता एमआयईबी म्हणजे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ असेल. आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी या शिक्षण मंडळाप्रमाणेच राज्याचा शिक्षण विभागही आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू करत आहे. 


१०० शाळांत पायलट प्रोजेक्ट 
नंदकुमारम्हणाले, सुरुवातीला आम्ही राज्यातील शंभर निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासंबंधीची योजना आखण्यात आली आहे. या शंभर शाळा आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न असतील. त्याबरोबरच परदेशातील शाळांनाही संलग्नता देण्याची यात तरतूद असेल. मराठीबरोबरच उर्दू, हिंदी आणि गुजरातीसह अन्य काही भाषांचा यात समावेश असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...