आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक परिस्थिती असतानाही गाेदाकिनारी विक्रेत्यांनी मांडला बाजार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला महापूर येऊन थेट गाडगे महाराज पुलाला पाणी लागले. मात्र, बुधवारी (दि. १८) पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरल्यानंतरही तेथील धोकादायक परिस्थिती कायम आहे. अशा परिस्थितीतही आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी नदीच्या काठी दुकाने लावली. तसेच, काही भाजी विक्रेत्यंानी तर थेट गणेशवाडीच्या रस्त्यापर्यंत बस्तान मांडले होते. हे पाहूून रहिवाशांच्या काळजाचा ठाेका चुकत असताना महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याचे तिकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

 

शहरासह धरणक्षेत्र परिसरात गेल्या दिवसांपासून पावसाची संततधार कायम होती. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला. पावसाची संततधार आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढत जाऊन थेट गाडगे महाराज पुलाला पाणी लागले; मात्र बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने पूर ओसरला असला तरी नदीपात्रातील पाण्याचा वेग लक्षात घेता धोकादायक स्थिती कायमच आहे. पुराची स्थिती काहीशी कायम असताना त्याकडे दुर्लक्ष करीत विक्रेत्यंानी कोणतीही भीती न बाळगता थेट नदीपात्राजवळच दुकाने मांडली होते. वाहणारे पाणी, साचलेला चिखल अशी स्थिती असताना भाजीविक्रेत्यांनी मांडलेले बस्तान आणि त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याचबरोबर, भाजी विक्रेत्यांनी थेट गणेशवाडीच्या रस्त्यापर्यंत दुकाने लावली होती. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशी धोकादायक व अडचणीची स्थिती असताना या ठिकाणी एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्याने विक्रेत्यांना हटविण्याचे वा रोखण्याचे कर्तव्य बजावले नाही. महापालिका प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 

गणेशवाडीतील भाजीबाजार पडला ओस
गोदाकाठी भाजीविक्रेत्यांनी बाजार मांडलेला असताना दुसरीकडे मात्र लाखो रुपये खर्चून साकारण्यात आलेला भाजीबाजार मात्र अोस पडलेला असल्याची स्थिती बघावयास मिळत होती. अशा धोकादायक परिस्थिती बघता या विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात तरी या भाजीबाजारात स्थलांतर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...