आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांनी पाथर्डीजवळ भल्या पहाटे पकडले पाच लाखांचे मेफ्रेडाेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यभरातील तरुणांना विळख्यात अडकवणारा मेफ्रेडाेन (एमडी) हा घातक अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी अाणताना तिघांना पोलिसांनी बुधवारी (दि. १६) पहाटे पाथर्डीरोडवर सापळा लावून अटक केली. या कारवाईत पाच लाख ३० हजारांचे २६५ ग्रॅम एमडी, टाटा सफारी व मोबाईल असा एकूण १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा अादेश दिला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने रणजित गोविंदराव मोरे (३२, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, वृंदावननगर, जत्रा हॉटेलजवळ) यांना एमडी हे ड्रग नेताना अटक केली. युनिटच्या अधिकाऱ्यांना मुंबईहून टाटा सफारी (एम. एच. १५, इक्यू ५००५) या वाहनातून एमडी ड्रग विक्रीसाठी पाथर्डी फाट्यावरील रायबा हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोेलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. रात्री एक वाजेपासूनच पोलिसांनी सापळा रचला. पावणेदोनच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाणारी संशयित सफारी अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून हॉटेल रायबाजवळ या तिघांना ताब्यात घेतले. पथकाने संशयितांची झडती घेतली असता संशयित रणजित मोरे याच्याकडे ९० ग्रॅम एमडी व १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल, संशयित पंकज दुंडे याच्याकडे ९० ग्रॅम एमडी व दोन मोबाइल तर तिसरा संशयित नितीन माळोदे याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी व १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आढळून आला. पोलिसांनी ड्रग्ज, मोबाइल व सफारी गाडी जप्त केले. तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

दोघांवर २०१२ मध्ये दरोड्याचा गुन्हा 
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी पंकज दुंडे व नितीन माळोदे या दोघांवर २०१२ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयितांनी एमडी अमली पदार्थ शहरात कोणाला विकायला आणले होते, याचा तपास केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


एमडीचे दुष्परिणाम घातक; राज्यभरात घातलेय थैमान 
मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रगने सध्या राज्यभरात थैमान घातले असून, कॉलेज तरुणांपासून शाळकरी विद्यार्थीही त्याच्या फेऱ्यात अडकले आहेत. हे ड्रग घेतल्याने कमालीचा उत्साह आल्याचे वाटत असले, तरी त्याचे नंतरचे दुष्परिणाम फारच घातक आहेत. एमडी घेतल्यानंतर दोन-तीन दिवस झोप येत नाही, तात्पुरता उत्साह जाणवतो; पण त्यानंतर टोकाचे नैराश्य येते. तसेच ड्रगचा अमल असेपर्यंत भूकही लागत नाही. शरीरासाठी ते खूपच घातक असून २०१५ पासून या अमली पदार्थावर बंदी घालण्यात आलेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...