आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक युद्धात 'MiG-21' विमानांने गाजवली मर्दुमकी, दिला सर्वोत्कृष्ट हवाई शक्तीचा प्रत्यय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिकोयान मिग-21 हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला 'बालालैका' या टोपणनावानेदेखील ओळखळे जाते. कारण हे विमान या नावाच्या रशियन वाद्या सारखे दिसते.मिग-२१च्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. जगातील सुमारे ५० देशांमध्ये आणि चार खंडात हे विमान वापरण्यात येते. मिग-21 हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात आजच्या दिवशी १० जून १९६६ मध्ये नाशिक जवळील 'हिंदुस्थान एरॉनॉटिक्स' कंपनीच्या कारखान्यात या विमानाच्या उत्पादनास सुरुवात झाली. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला मिग-21 विमानाविषयीची माहिती देत आहे.

 

१९५० मध्ये मिग-21 विमानाच्या संशोधनाला सुरूवात झाली. त्यानंतर १९५४ मध्ये या विमानाच्या पहिल्या प्रतिकृतीची A-1 नावाने निर्मिती करण्यात आली. परंतु, त्याचे इंजिन कमी शक्तीचे आहे, हे लक्षात आल्यानंतर सुधारित A-2, A-3 आणि A-4 आवृत्त्या बनवण्यात आल्या. १६ जून १९५५ मध्ये या विमानाच्या A-4 प्रतिकृतीने हवाई झेप घेतली. मिग-21 हे रशियाचे पहिले लढाऊ आणि प्रतिभेदक क्षमता एकत्र असलेले विमान ठरले. या विमानाचा आराखडा नंतर अनेक विमानांसाठी वापरला गेला.


भारताची खरेदी....
भारतीय हवाई दलाने हे विमान १९६१ साली खरेदी करण्याचे ठरवले. कारण तेव्हा रशियाने जुळणीसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. या विमानाच्या रुपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे पदार्पण झाले. परंतु १९६५च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे याचा परिपूर्ण वापर झाला नाही. मात्र हे विमान काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. या शिवाय या विमानांच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली. तसेच वैमानिक प्रशिक्षणावर अजून भर देण्यात आला. त्यानंतर १९६९ मध्ये भारताकडे १२० मिग-21 विमाने झाली.


भारत-पाक युद्धात गाजवली मर्दुमकी...
१९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात याच मिग-21 विमानांनी मोठी कामगिरी बजावली. भारतीय उपखंडात भारताची हवाई प्रहार शक्ती सर्वोच्च असल्याचा प्रत्यय दिला. पाकिस्तानच्या एफ-१०४ विमानांवर बसवलेल्या तोफांमुळे त्यांचा मोठा बोलबाला झाला होता. पण भारतीय वैमानिकांचे उत्तम प्रशिक्षण आणि मिग-२१ विमानांच्या प्रतिभेद शक्तीचा नेमका वापर करून पाकिस्तानची चार एफ-१०४ विमाने पाडली गेली. तसेच दोन एफ ६ विमाने, अमेरिकेने पुरवलेले एक एफ-८६ साब्रे विमान आणि एक लॉकहीड सी-१३० हर्क्युलस विमान यांचा धुव्वा उडवला. या हवाई युद्धाने जगाचे लक्ष भारताच्या हवाईदलाकडे आणि मिग-21 या विमानांकडे वेधले गेले. अनेक देशांनी भारताच्या वैमानिक प्रशिक्षणात रस घेतला. भारतानेही अनेक देशांच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले. १९७०च्या दशकात सुमारे १२० इराकी वैमानिक भारतातून प्रशिक्षित होऊन गेले.


कारगील युद्धात पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अट्लांटिक विमान पाडले...
१९९९ साली पाकिस्तानने भारतीय सीमेत घुसखोरी केल्याने भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धातही मिग-२१ विमानांचा वापर भारताने केला. मात्र या युद्धात एक विमान पाकिस्तानी रॉकेट लाँचरद्वारे पाडले गेले. परंतु, त्याचवेळी भारतीय हवाईदलाच्या याच विमानांनी हवेतल्या हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राचा प्रयोग करून पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अट्लांटिक विमान पाडले.


अशी आहे मिग-२१ विमानाची रचना....
या विमानात हवा समोरून आत ओढली जाते. त्यामुळे रडार ठेवण्याची जागा नाही. या कारणामुळे पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा उपयोगात आला नाही. तसेच, या विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले, तर विमानाचा गुरुत्व मध्य मागच्या बाजूला घसरतो. त्यामुळे त्याची क्षमता ४५ मिनिटे उड्डाणाची ठरते. या विमानाचा पल्ला २५० किलोमिटर्सचा आहे. तसेच त्रिकोनी पंखाच्या आकारामुळे ते वेगात वर चढू शकत असले, तरी वळवतांना वेग खूप कमी होतो. हे विमान ४६२५० फुट प्रतिमिनिट इतक्या वेगात हवेत झेप घेते. हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-१६ विमानाइतका ठरतो. या विमानात सुधारणा करत मिग-२३ आणि मिग-२७ ची निर्मिती करण्यात आली. या विमानाचे सोपे असलेले नियंत्रण, जोरदार इंजिन यामुळे हे विमान उडवण्यासाठी सोपे आहे. तसेच, विमानाच्या मुख्य पंखामागे असलेल्या छोट्या पंखांमुळे विमानाला स्थिरता लाभते. यामुळे नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते.

बातम्या आणखी आहेत...