आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेने राखला गड; सेना-भाजपचा धुव्वाच; अॅड. भाेसले यांनी केला चव्हाण यांचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. वैशाली मनाेज भाेसले यांनी शिवसेनेच्या डाॅ. स्नेहल संजय चव्हाण व भाजपच्या विजया हरिभाऊ लाेणारी यांचा धुव्वा उडवून तब्बल २ हजार ३२२ मतांनी विजय मिळवत प्रभाग क्रमांक १३ चा गड राखला. मतमाेजणीच्या प्रारंभिक फेऱ्यांमध्ये अतिशय चुरशीच्या वाटणाऱ्या; मात्र निकालाअंती मनसेला माेठा विजय मिळवून देणाऱ्या या बहुचर्चित निवडणुकीत भाेसले यांना ७ हजार ४५३, चव्हाण यांना ५ हजार १३१ तर लाेणारी यांना ४८१० मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना मात्र अनामत रक्कमही वाचविता अाली नाही. निकालाकडे नाशिककरांचे लक्ष लागले हाेते. 

 

या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. ६) ३९.७१ टक्के मतदान झाले हाेते. गंगापूरराेडवरील शिवसत्य सभागृहात सकाळी १० वाजता मतमाेजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत चव्हाण यांनी ६९५ मते मिळवत ३२२ मतांची अाघाडी घेतली हाेती. परंतु, दुसऱ्या फेरीपासून भाेसले यांनी ही अाघाडी माेडून काढली. तिसऱ्या फेरीत थेट ९६२ मतांची मजल मारत विजया लाेणारी यांनी २१२ मतांची अाघाडी घेतली. पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये अनुक्रमे चव्हाण, भाेसले अाणि लाेणारी यांनी अाघाडी घेतल्याने निवडणूक चुरशीची हाेण्याची अपेक्षा हाेती. चाैथ्या फेरीनंतर मात्र भाेसले यांनी घेतलेली अाघाडी अखेरच्या म्हणजे ११ व्या फेरीपर्यंत कायम राहिली. चव्हाण व लाेणारी यांच्यात मात्र अखेरपर्यंत चढाअाेढ हाेती. शेवटच्या तीन फेऱ्या बाकी असतानाच माजी नगरसेवक संजय चव्हाण अाणि हरिभाऊ लाेणारी यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. विजयानंतर भाेसले यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी अामदार नितीन भाेसले, माजी महापाैर अशाेक मुर्तडक, नगरसेवक शाहू खैरे, डाॅ. हेमलता पाटील, गजानन शेलार, माजी शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष अनिल मटाले, डाॅ. प्रदीप पवार अादी उपस्थित हाेते. 


अाठ उमेदवारांपैकी तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार वगळता पाचही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात राष्ट्रवादीच्या बंडखाेर माजी नगरसेविका रंजना पवार यांचाही समावेश अाहे. त्यांना ४३९ मते मिळाली. चाैथ्या क्रमांकावरील ज्याेती पाटील-डाेके यांना ४४२ मते मिळाली. 


'नाेटा' वापरणारे तब्बल २५० मतदार 
'निवडणुकीतील नऊही उमेदवार पसंत नाही', असे म्हणणारे तब्बल २५० मतदार हाेते. या मतदारांनी 'नाेटा' चा अधिकार वापरत उमेदवारांना नाकारले. 


कार्यकर्त्यांचा जल्लोष, मिरवणुकीस फाटा 
पोटनिवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्र परिसरात गर्दी केली होती. निवडणुकीचे निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा जयघाेष करत जल्लाेष केला. कै. सुरेखाताई भाेसले यांना श्रद्धांजली अर्पण करीत विजयी मिरवणूक काढण्यास फाटा देण्यात अाला. 


पोलिसांची मोबाइलला बंदी, अधिकाऱ्यांचा सर्रास वापर 
मतदान केंद्रात जाणारे उमेदवारांचे प्रतिनिधी, पत्रकारांना मोबाईल नेमण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येत होती. मात्र, दुसरीकडे निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून मतमाेजणी केंद्रात सर्रास मोबाइलचा वापर केला जात होता. 


भाेसले कुटुंबातील सदस्याची मनसेकडून सातवी निवडणूक 
या निवडणुकीच्या निमित्ताने भाेसले कुटुंबातील सदस्याने सलग सातव्यांदा मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यात पाच निवडणुकांमध्ये विजय, तर दाेन वेळा पराभवाला सामाेरे जावे लागले. 

बातम्या आणखी आहेत...