आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये संभाजी भिडेंना अटकेच्या मागणीसाठी रास्ता रोको, काही काळ तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काेरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर वादग्रस्त ठरलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या जाहीर सभेला विराेध करत अाणि त्यांच्या अटकेची मागणी करत रविवारी (दि. १०) सायंकाळी विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून अांदाेलन केले. अांदाेलनकर्त्यांनी अचनाक सीबीएस चाैकात रास्ता राेकाे केल्याने पाेलिसांसह नागरिकांची पळापळ हाेऊन तणाव निर्माण झाला हाेता. याचवेळी अज्ञात इसमांनी पेटता बाेळा धावत्या बसच्या दिशेने फेकल्याने तणावात भर पडली. मात्र, वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने तत्काळ बस थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अांदाेलकांनी पळ काढला. या घटनांमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजीराेड, मेनराेड, शालीमार चाैकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या नाशिक शाखेच्या वतीने रविवारी संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभेला पोलिसांनी अटी-शर्तीवर परवानगी दिली हाेती. मात्र, या सभेला पाेलिसांनी परवानगी देवू नये, अशी मागणी विविध संघटनांनी करत भिडे गुरुजींचा निषेध नाेंदविण्याची तयारी केली हाेती. 


या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासूनच पाेलिसांनी रविवार कारंजा येथील सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक वळवत ठिकठिकाणी बंदाेबस्त तैनात केला हाेता. सायंकाळी ६ वाजता सभास्थळी भिडे गुरुजी यांचे अागमन झाल्याचे समजताच सीबीएस चाैकात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भिडे यांच्या निषेधाच्या घाेषणा देत अचानक रास्ता राेकाे केला. पाेलिस यंत्रणेचाही निषेध करीत भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी करण्यात अाली. 


वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी अांदाेलनकर्त्यांची समजूत काढत त्यांना चाैकातून बाजूला केले. काही कार्यकर्त्यांनी शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ थांबत निदर्शने केले. भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात भिडे गुरुजी मुख्य आरोपी असतानाही नाशिकच्या पाेलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. थाेड्याच वेळात माेठ्या संख्येने जमाव जमल्याने व तणावाची परिस्थिती वाढत गेल्याने अतिरिक्त पाेलिस फाैजफाटा तैनात करण्यात अाला.आंदोलन चिघळण्याची चिन्ह दिसू लागल्याने वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी अांदाेलनकर्त्यांशी चर्चा सुरू केली. त्यांना शांतता राखण्याचे अावाहन करत भिडे यांनी जर अाक्षेपार्ह अथवा प्रक्षाेभक भाषण केल्यास त्यांच्याविरूद्ध निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे अाश्वासन अधिकाऱ्यांनी अांदाेलनर्त्यांना दिले. त्यानंतर काही वेळातच अांदाेलकर्त्यांनी राष्ट्रगीत म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. पोलिस अायुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे यांच्यासह सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षकांसह दाेनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


सभास्थळी बंदोबस्त 
रविवार कारंजा परिसरातील सभास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी सुरू होती. सभास्थळाकडे जाणाऱ्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येत होती. गर्दी वाढल्याने पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने काही कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला हाेता. 


वाहनांना प्रवेश बंद 
रविवार कारंजा परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. या मार्गावरील सर्व वाहतूक घारपुरे घाटमार्गे इतरत्र वळवण्यात आली होती. 


सिबीएस चाैकात रास्ताराेकाे, बस पेटविण्याचा प्रयत्न, बसेसवर दगडफेक 
भिडे यांच्या अटकेची मागणी करीत अादंाेलनकर्त्यांमधील अज्ञात इसमाने सीबीएस अागारातून बाहेर पडणाऱ्या म्हसरूळ बसवर पेटता पेट्राेलचा बाेळा फेकल्याने व त्याचवेळी दुसऱ्याने बसच्या काचेवर दगड फेकल्याने चालकाच्या पाेटात भीतीचा गाेळा उठला हाेता. त्याने प्रसंगावधान राखत थाेडे अंतर पुढे जावून बस थांबवल्याने दुर्घटना टळली. हा प्रकार लक्षात येताच पाेलिस दगड फेकणाऱ्याच्या मागे धावले. या घटनेत दाेन बसेसचे नुकसान झाल. सुदैवाने काेणत्याही प्रवाशाला अथवा बसचालक,वाहकांना नुकसान पाेहचले नाही. 


शहरात ठिकठिकाणी तणाव 
रविवार सुटीचा दिवस असल्याने अाणि शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची सीबीएस, शालीमार परिसरात गर्दी हाेती. त्यातच एसटीचा संप मिटल्याने बसस्थानक परिसरात प्रवाशांचा गर्दी हाेती. यात अचानक सीबीएस परिसरात अांदाेलनकर्त्यांनी घाेषणाबाजी केल्याने सर्वांची धावपळ झाल्याने गाेंधळ निर्माण झाला हाेता. अशाेकस्तंभ ते रविवार कारंजा, शालीमार परिसरातही तणाव निर्माण झाल्याने काही वेळातच दुकानदारांनी दुकाने बंद केली. पाेलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. 

 

बातम्या आणखी आहेत...