आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीची चिन्हे; नाफेड करणार २५ हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- कांदा दर गत महिन्यापासून वधारल्याने शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे. मात्र, यंदा पाऊस फक्त ठराविक तालुक्यामध्येच कोसळत असल्याने कांदा क्षेत्रात त्याने पाठ फिरविली आहे. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात ग्राहकांना वाढत्या कांदा दरामुळे खिशाला झळ पोहचू नये यासाठी केंद्र शासनान नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. नाफेडने आतापर्यंत २ कोटी रुपयांचा कांदा बाजारभावाने खरेदी केला आहे. 


गतवर्षी दिल्ली शहरात किरकोळ बाजारात कांदा दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा संताप परवडणार नाही म्हणून वाढत्या कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापासूनच नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमधून हा कांदा खरेदी करण्यात येत अाहे. उर्वरित कांदा पुणे परिसरातून खरेदी केला जात आहे. या आठवड्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा हा ७०० रुपयापासून ते १२०० रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी देखील कांदा साठवणूक करून ठेवली आहे. नफा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील कांद्याची साठवणूक केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरात चाळी कांद्याने भरलेल्या दिसून येत आहे. 


परदेशी बाजारात चीनची घुसखोरी 
कांदा दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवणूक केली असल्याने सध्या दर स्थिर आहे. मध्यप्रदेश सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा ८ रुपयांनी खरेदी करण्याचे शेतकऱ्यांना अाश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करून ठेवला अाहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने श्रीलंका, दुबई, सिंगापूर, मलेशिया या देशामध्ये भारतीय कांद्याचे दर वाढताच चीनचा कांदा यायला लागला. त्यामुळे पाच दिवसापासून पुन्हा भारताचा दर किलो मागे २ रुपयांनी घसरला. 


कर्नाटकच्या कांद्यावर नाशिकच्या व्यापाऱ्यांचे भवितव्य 
कर्नाटकमध्ये गतवर्षी मुसळधार पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेजी आली होती. यंदा पाऊस ठरविक क्षेत्रामध्येच पाऊस होत असून कांदा लागवडीवर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य हे कर्नाटकच्या कांद्यावर अवलंबून राहणार असल्याचे नाशिकचे कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी दिव्य मराठीला सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...