आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरापासून शेकडाे मैल दूर, एक संस्था देवदूतासारखी धावली अन‌् वाचले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- घरापासून शेकडो मैल दूर, जवळचे नातेवाइक व मित्रपरिवार नाही. अशा प्रसंगात जीवावर संकट बेतल्यावर नाशकातील श्री नारायणगिरी महाराज फाउंडेशन देवासारखी धावून आल्याने जळगाव जिल्ह्यातील भादली येथील भाविकांना मोठा दिलासा मिळाला. 


तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले जळगावमधील भादली येथील १५ भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने २१ जून रोजी निघाले होते. तिरुपतीपासून ५० किलोमीटर वर थिरूवेल्लूरजवळ कंटेनरने धडक दिल्याने चार भाविक जखमी झाले. यात भादली येथील विनायक रतन कोळी (३८) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना चेन्नईमधील श्री रामचंद्र हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात अाले. प्रथम दाेन लाख रुपये जमा करा, मगच रुग्णाला दाखल करू अशी भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने घेतल्याने भाविकांची पंचाईत झाली. एवढी रक्कम भाविकांकडे नसल्याने विनायकचा जीव वाचवायचा कसा असा प्रश्न इतरांना पडला. जळगाव येथील विशेष शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद केदार यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. 


केदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक येथील श्री नारायणगिरी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू भागवत यांच्याशी संपर्क साधला. आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या कोळी यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग बघून चेन्नई येथील श्री रामचंद्र हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संपर्क करीत हॉस्पिटलच्या बँक अकाउंटचा क्रमांक घेतला. २२ जून व २६ जून रोजी प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये हॉस्पिटलच्या इंडियन बँकेच्या अकाउंटवर जमा केले. रक्कम जमा झाल्यानंतरच श्री रामचंद्र हॉस्पिटलने कोळी यांना उपचारासाठी दाखल करून घेतले. उपचारानंतर त्यांची तब्येत चांगली झाली अाहे. नारायणगिरी महाराज फाउंडेशनने केलेल्या मदतीमुळेच या रुग्णाचे प्राण वाचले. जिल्ह्याबाहेरचा रुग्ण असताना तामिळनाडूत जीवावर बेतलेले असताना फक्त पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवर या संस्थेने सामाजिक व्रत जोपासत दिलेल्या मदतीचे जळगाव जिल्ह्यातील भादली पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. एेेनवेळी ही मदत मिळाल्यामुळे काेळी यांनी नारायणगिरी फाऊंडेशनबाबत कृतज्ञता व्यक्त केली अाहे. 


यापूर्वीही पीडितांना केलीय फाउंडेशनने मदत 
श्री नारायणगिरी महाराज फाउंडेशनची स्थापना मागील वर्षी नाशिकमध्ये करण्यात अाली अाहे. समाजातील दिनदुबळ्या, पीडित, गरीब कुटुंबास जेव्हा संकटे येतील तेव्हा मदतीचा हात द्यायचा हा संस्थेचा उद्देश आहे. आजपर्यंत नारायणगिरी फाउंडेशनने अनेक गोरगरिबांना आर्थिक मदत केलेली अाहे. वादळी पावसात उघड्यावर आलेली कुटुंबे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही मदत देण्यात संस्था कायम पुढे राहिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...