आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर नाशकात शिक्षकांचा लाँग मार्च रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एक नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी उभारलेल्या आंदोलनाचा पहिला टप्पा २१ एप्रिल रोजी पार पडला. शनिवारपासून (दि. १८) शहापूर ते आझाद मैदान असा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब लाँग मार्च काढणार होते. मात्र, मुंबई पोलिसांनी यास परवानगी नाकारल्यानंतर तो रद्द करण्यात आला. येत्या २२ मे रोजी राज्यभरातील शिक्षक आझाद मैदानावर धरणे अांदोलन करणार आहेत. 

 

नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली अाहे. त्यापूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी व तुलनेने लाभदायक पेन्शन योजना चालू आहे. मात्र, या कचाट्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरडले जात आहेत. २००५ पूर्वीची नियुक्ती असूनही २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संभ्रमावस्था आहे. शिक्षण क्षेत्राला अनुदान न देण्याच्या धोरणाचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी १८ मेपासून शहापूर ते मंत्रालय अशी राज्यस्तरीय लाँग मार्च काढण्यात येणार होता.

 

१९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करून भविष्य निर्वाह निधीची कपात त्वरित सुरू करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली. मात्र, आचारसंहिता व जमावबंदीचे कारण देत पोलिसांनी शिक्षकांच्या लाँग  मार्चला परवानगी नाकारली असल्याने हा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

 

शिक्षकांचे कुटुंबीय २२ मे रोजी धरणे देणार  
२२ मे रोजी आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले जाईल. त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब तिथे येऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना या वेळी निवेदन दिले जाईल.   
नीलेश ठाकूर, अायोजक

 

आचारसंहिता असल्याचे कारण देत डॉक्टरांचा मोर्चाही रोखला

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी  डॉक्टर व कर्मचाऱ्यांना  शिक्षणाच्या व अनुभवाच्या अाधारे सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील ७ हजार कंत्राटी कर्मचारी नाशिकहून मुंबईला लाँग मार्च काढणार होते. शुक्रवारी सकाळी सात वाजता नियोजनाप्रमाणे औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमापासून मोर्चाला प्रारंभ होणार होता. मात्र, अाचारसंहिता सुरू असल्याने कारण पुढे करत पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे  संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. 

बातम्या आणखी आहेत...