आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची अन्यायकारक करवाढ; सर्वपक्षीयांकडून जनआंदोलनाचा एल्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - आर्थिक मंदी असतानाही महापालिका आयुक्तांनी सर्रासपणे शहर विकासाच्या नावाखाली कर वाढविण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. १ एप्रिलपासून वापरात नसलेल्या जमिनी आणि जागांसाठी ३ पैशांवरुन थेट ४० पैसे प्रति चौरस फूट असा कर केल्याने जमीन आणि मिळकतधारकांवर अन्याय झाला आहे. या अन्यायकारक करवाढीविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी एकत्रित येऊन जनआंदोलन उभारण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १०) नाशिकरोड येथील शेतकरी मेळाव्यात घेण्यात आला. 

 

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीवाढीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण समितीने सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवसेना, काँग्रेस, भाजप, काँग्रेस या पक्षांसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात स्मार्ट सिटीच्या नावाखाली नागरिकांची कराच्या माध्यमातून लूट सुरू करण्यात आली आहे. याविरोधात आताच आवाज उठविला नाही तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने यासाठी सर्वांनी एक होऊन आवाज उठविण्याची गरज असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी सांगितले. 

 

नाशिक महापालिका हद्दीमध्ये २५ हून अधिक गावांचा समावेश असल्याने त्यांनाही या आंदोलनामध्ये सहभागी करून घेऊन जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त कार्यालयावर याबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही याबाबत गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय झाला. 

 

पाथर्डीफाटा येथे उद्या बैठक 
शहर विकास आराखडा कृती समितीतर्फे पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्समध्ये गुरुवारी (दि. १२ ) सायंकाळी ६ वाजता शेतकरी व मिळकतधारकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पाथर्डी, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, दाडेगाव, अंबड, कामटवाडे या गावांतील मिळकतींवर वाढीव घरपट्टीच्या निर्णयाविरोधात एकजूट दाखविण्यासाठी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

एका एकरात सव्वा लाख काय ५० हजारही मिळत नाहीत 
मेळाव्यामध्ये एका शेतकऱ्याने सध्या शेतीची परिस्थिती फार बिकट झाली असून एका एकरात सव्वा लाख रुपयेदेखील उत्पन्न मिळत नाही. तेव्हा एवढा भयावह कर कुठून भरायचा, असे भाषणात सांगितले. त्यावर भाजपचे शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप यांनी 'मी पण शेतकरी आहे. सध्या एका एकरमध्ये सव्वा लाख तर सोडाच पण पन्नास हजार रुपयेही मिळत नाही' असे म्हटल्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

 

आयुक्त नव्हे, तर वसुली कारकून 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त म्हणून नाही वसुली करणारे कडक कारकून म्हणून पाठविले असल्याचा आरोप रमेश औटे यांनी केला. 

 

कर आयुक्त वाढवितात की मुख्यमंत्री 
महापालिका क्षेत्रातील दिवसेंदिवस कर वाढवून नागरिकांची ससेहोलपट सुरू केली आहे. मात्र, हे कर पालिका आयुक्त मुंढे हेच वाढवित आहे की खासगीकरणाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाढवित आहेत, हेदेखील तपासण्याची गरज असल्याचे गजानन शेलार यांनी सांगितले. 

 

महत्त्वाचे मुद्दे 
जनआंदोलनामध्ये शेतकऱ्यांसह महिलाही सहभागी होणार. 
महापालिका आयुक्तांना लोकन्यायालयात खेचणार. 
सर्व पक्षांनी एकत्रित लढा द्यावा. 
शहर बससेवेतून ८ कोटी रुपयांचा होणार तोटा 
महापालिकेचे जकात आणि एलबीटीमुळे नुकसान 
महासभेच्या अधिकारावर गदा आणली. 
जमिनी कसायला घेऊन शेतकरी कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या 
मल्टिप्लेक्सच्या पार्किंगमधून होणाऱ्या लुटीकडे पालिका आयुक्ताचे दुर्लक्ष. 
विविध स्वरूपाची करआकारणी मात्र त्या तुलनेत सुविधा मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...