आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळच्या दुर्घटनेत नाशिकचा जवान प्रथमेश कदम शहीद, पोवाकी गावात अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडलेल्या दुर्घटनेत कर्तव्य बजावत असताना नाशकातील जवान प्रथमेश दिलीप कदम शहीद झाला आहे. भोपाळमध्ये शुक्रवारी (दि. ११) एका अपघाताची चाैकशी करताना अचानक झालेल्या स्फाेटात प्रथमेश ९० टक्के भाजला होता. त्याला उपचारासाठी दिल्लीला पाठवण्यात अाले हाेते. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान प्राणज्याेत मालवली. गुरुवारी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या शेवते, पाेवाकी या मूळ गावी त्याच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

सातपुरातील अशाेकनगर परिसरात राहणारा प्रथमेश हा भोपाळमधील आर्मीच्या ३ ईएमई युनिटमध्ये कर्तव्यावर होता. भोपाळमध्ये शुक्रवारी ओव्हरहेड वायरला लागून एका ट्रकचा अपघात झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रथमेश व त्याच्या सहकाऱ्यांना पाठवण्यात आले होते. या ठिकाणी काम करताना झालेल्या अपघातात प्रथमेश सुमारे ९० टक्के भाजला होता. प्रथमेशच्या पश्चात आई प्रतिभा, वडील दिलीप कदम व विवाहित बहीण प्रियंका असा परिवार आहे. गुरुवारी प्रथमेशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी नेण्यात येणार असून तेथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

एकुलता एक मुलगा, बारावीनंतर सैन्यात
प्रथमेशचा जन्म २७ मार्च १९९२ रोजी झाला. त्याचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण व्ही. एन. नाईक विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण मराठा हायस्कूलमध्ये झाले. केटीएचएममध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १२ वीनंतरच ताे सैन्यात दाखल झाला. ताे एकुलता असल्याने घरात लाडका हाेता. मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेशचा विवाह जुळवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सातपूरच्या राधाकृष्णनगर, अशोकनगर व श्रमिकनगर परिसरात त्याच्या मित्रपरिवारातर्फे श्रद्धांजलीचे फलक लावण्यात अाले असून अनेक जण अंत्यसंस्कारासाठी रायगडकडे रवाना झाले अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...