आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालरोगतज्ज्ञ संघटनेने ३५३ अादिवासी कुपोषित बालकांना मृत्यूच्या दारातून आणले बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सोशल नेटवर्किंग फोरम व भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील दुर्धर आजाराने त्रस्त ३५३ कुपोषित मुलांवर आैषधोपचार करत त्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणले आहे. गेल्या डिसेंबरपासून संघटनेच्या शंभरहून अधिक डॉक्टरांनी या मुलांवर उपचार केले आहेत. या मोहिमेत हजारो मुलांची तपासणी करण्यात अाली. 


जिल्ह्यातील एकही मूल कुपोषित राहू नये, सर्व मुलांसह आईला पौष्टिक व सकस आहार मिळावा, तसेच ही मुले उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी या दाेन संस्थांनी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील विविध भागात भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने सोशल नेटवर्किंग फोरमच्या मदतीने घेतलेल्या शिबिरांत हजारो कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर व हरसूल भागातील कुपोषित बालकांची एसएएम (गंभीर तीव्र कुपोषण) एमएएम (माध्यम कुपोषण) व दुर्धर आजारी कुपोषित बालके अशी वर्गवारी करून ३५३ बालकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. या बालकांच्या तपासणीसाठी शहरातील १७ बालरोगतज्ज्ञांची खास नियुक्तीच संघटनेकडून करण्यात आली होती. हे बालरोगतज्ज्ञ या बालकांची संपूर्ण तपासणी व काळजी घेत होते. डिसेंबर ते मार्चदरम्यान संपूर्ण तपासणी व काळजी घेण्यात आली. 


मुलांना पहिल्या महिन्यात फुटाणे, गूळ-शेंगदाण्याची चिक्की, दुसऱ्या महिन्यात सातूच्या पिठाच्या चकल्या, तिसऱ्या महिन्यात गहू व मूगडाळ पिठाचे साजूक तुपातील लाडू व सातूच्या पिठाच्या चकल्या देण्यात आल्या. यानंतर या बालकांमधील ७९ मुलांचे वजन एक किलोपेक्षा जास्त वाढले. १०३ मुलांचे वजन अर्धा ते १ किलोच्या दरम्यान वाढले. यानंतर संघटनेतर्फे चार शिबिरे घेण्यात आली. यातही मुलांचे वजन मोठ्या प्रमाणावर वाढले. तीन महिने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटना, आयएमए, मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांनीही सहभाग घेतला. बालराेगतज्ज्ञांच्या या बालरुग्णसेवेमुळे अादिवासी पाड्यांवर अाशेचा किरण निर्माण झाला अाहे. हाच प्रयाेग अाता इतरही अादिवासी पाड्यांवर राबविण्याचा संकल्प करीत त्या दिशेने काम सुरू केले अाहे. 

 

अतितीव्र कुपोषित बालकांना जीवदान 
मोहिमेदरम्यान तीन अतितीव्र कुपोषित बालकांना वाचविण्यात यश आले. छगन ठोले, वर्षा बामणे व अभय गुरव या तीन अत्यवस्थ बालकांना 'मराठा विद्या प्रसारक'च्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये दाखल करून बालरोगतज्ज्ञांच्या सहाय्याने आैषधोपचार करण्यात आले. या बालकांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणण्यात डॉक्टरांना यश आले. 


कुपोषणमुक्तीची मोहीम 
नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी ५६ बालके कुपोषणामुळे दगावल्याने कुपोषण मुक्तीची मोहीम राबविण्याचे ठरवले. निदान, उपचार आणि आहार या तीन गोष्टींवर काम करून कुपोषणमुक्तीसाठी मोहीम सुरू केली. बालरोगतज्ज्ञ संघटना व आयएमएच्या मदतीमुळे ही मोहीम यशस्वी झाली. अनेक मुलांना कुपोषणातून बाहेर आणण्यात आम्ही यशस्वी झालो.
-प्रमोद गायकवाड, संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम 


वेळीच उपचार गरजेचे 
जिल्ह्यात वाढलेले कुपोषणाच्या प्रमाण लक्षात घेता आम्ही हरसूल आणि त्र्यंबकेश्वर भागातील कुपोषणग्रस्त क्षेत्रात मोहीम तीन महिने राबविली. मोहिमेत मुलांना आैषधोपचार व पौष्टिक आहार दिला. मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून या भागातील महिलांना मुलांच्या खाण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. शासनाकडून आदिवासी भागात दिला जाणारा खाऊ मुलांपर्यंत पोहोचावा तसेच कुपोषित बालकांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. 
-डॉ. संगीता बाफना, भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना 

 

बातम्या आणखी आहेत...